कल्याणीनगर (पुणे) येथील अल्पवयीन मुलांना मद्य देणारे दोन्ही पब बंद !

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची कारवाई !

पुणे – ‘पोर्शे’ गाडी अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणे, समयमर्यादेचे पालन न करणे या कारणांवरून ‘हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रा. लि.’ चे (कोझी), ‘पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर’ चे (ओक वूड) मॅरियट सूट – ब्लॅक हे हॉटेल्स, परमिट रूम यांवर ‘पब बंद’ची कारवाई जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१ मे या दिवशी केली. पुढील आदेश येईपर्यंत हे ‘पब’ बंदच रहाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ या दोन्ही पबचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या दोन्ही पबमध्ये मद्यविक्रीविषयीच्या नोंदी नसणे, अभिलेख अद्ययावत् नसणे या कारणांनी पब बंद करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आला होता. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत हे दोन्ही पब बंद रहातील, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजीत पाटील म्हणाले, ‘‘शहरातील सर्व पबसह इतर अनुमतीधारक (परिमट) ‘रूम’ची विशेष पडताळणी मोहीम चालू करण्यात आली आहे. हे व्यवसाय नियमानुसार चालू आहेत का ? नियमांचे उल्लंघन होते का ? याचे अन्वेषण होईल. नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल, पब आणि आस्थापनाला मद्य विक्रीविषयी देण्यात आलेले परवाने निलंबित किंवा रहित करण्यात येतील.

संपादकीय भूमिका

‘पुणे येथील सुसंस्कृपणा गेला कुठे ?’ या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीच्या माहेरघरात रहाणारे देतील का ?