पणजी, १८ मे (वार्ता.) – उष्णतेमुळे राज्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. मौसमी (मॉन्सून) पावसाला विलंब झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जलस्रोत खात्याच्या जलाशयातील पाणी देखरेख योजनेनुसार दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणार्या साळावली धरणामध्ये केवळ ३० टक्के, सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणात १८ टक्के, डिचोली येथील आमठाणे धरणात ३२ टक्के, पंचवाडी धरणात २१ टक्के आणि काणकोण तालुक्यातील चापोली अन् गावणे धरणांमध्ये प्रत्येकी ४७ टक्के पाणी शिल्लक आहे. गोव्याला पाणीपुरवठा करणार्या महाराष्ट्र राज्यातील तिलारी धरणात ३३ टक्के पाणी शिल्लक आहे. जलस्रोत खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ एप्रिल या दिवशी (सुमारे ४४ दिवसांपूर्वी) साळावली धरणात ४८.७ टक्के, अंजुणे धरणात ३८.५ टक्के, आमठाणे धरणात ३७.४ टक्के, पंचवाडी धरणात ३८.५ टक्के, चापोली धरणात ५८.३ टक्के, गावणे धरणात ५५.९ टक्के आणि तिलारी धरणात ९४.१ टक्के पाणी शिल्लक होते. गोव्यात हल्लीच काही ठिकाणी अवेळी पाऊस पडलेला असला, तरी राज्यात अनेक भागांत आताच पाण्याचे दुर्भिक्ष्य भासत असल्याचे वृत्त आहे. काहींनी पाण्याच्या टंचाईमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चेही काढलेले आहेत.
धरणांमध्ये जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक ! – जलस्रोत खाते
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले, ‘‘धरणांमध्ये जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. अंजुणे धरणात १८ टक्केच पाणी असले, तरी धरणात ८०० हून अधिक हेक्टर मीटर पाणी शिल्लक आहे. या धरणातून प्रतिदिन दीड ते दोन हेक्टर मीटर पाणी घेतले जाते. साळावली धरणातही पुरेसा पाणीसाठा आहे.’’
जलस्रोत खात्याने शेतीसाठी कालव्यांद्वारे दिले जाणारे पाणी १५ मेपासूनच बंद केले आहे, तरीही धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. धरणांबरोबरच काही नद्यांचेही पाणी आटू लागले आहे. सांगे तालुक्यातील रगाडा नदी कोरडी पडली आहे. डिचोली येथील वाळवंटी नदीची अशीच स्थिती आहे. याविषयी जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले, ‘‘पश्चिम घाटातून वहाणार्या नद्या एप्रिल-मे या महिन्यांत कोरड्या पडतात.’’