१० सहस्र मतांचा फरक पडण्याची शक्यता !
बाळगंगा धरण प्रकल्पातील ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त अप्रसन्न !
रायगड – लोकसभेच्या तिसर्या टप्प्यासाठी ७ मे या दिवशी राज्यातील ११ मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई येथील गावकर्यांनी बाळगंगा धरण प्रकल्पाविषयी सरकारकडे योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला; मात्र गावकर्यांच्या या मागण्यांना सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने गावकर्यांनी ७ मे या दिवशी पार पडणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून गावातील केवळ एका व्यक्तीने मतदान केले असून वरसईसह इतर ६ गावांतील एकाही गावकर्याने मतदान केंद्रांकडे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे रायगड लोकसभेवर जवळजवळ १० सहस्र मतांचा फरक पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय अधिकार्यांनाही गावकर्यांची समजूत काढण्यात अपयश आले असून ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर कायम आहेत.
बाळगंगा धरण प्रकल्प आल्यानंतर येथील अनेक जण विस्थापित झाले आहेत. अनेकांच्या भूमी या प्रकल्पात गेल्या आहेत. त्या भूमी मिळवण्यासाठी स्थापन केलेल्या संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याविषयी चेतावणी दिली होती; परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो असफल ठरला. रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांनीही येथे येऊन गावकर्यांची समजूत काढली; परंतु १४ वर्षांपूर्वी चालू झालेले हे धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे; परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये अप्रसन्नता असल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.