देशाची सुरक्षा इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

नवी देहली – भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही. ते २३ एप्रिल २०२४ या दिवशी नवी देहली येथे ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या नवव्या ‘नॅशनल लीडरशिप कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते.

जनरल मनोज पांडे म्हणाले, ‘‘क्षमतेच्या विकासाचा विचार केला, तर आपण महत्त्वाचे तंत्रज्ञान आयात करत आहोत आणि ज्या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे, त्या देशांवर अवलंबून आहोत. अशा परिस्थितीत आपण नेहमीच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे रहाणार आहोत, हे आपल्याला स्पष्ट व्हायला हवे.’’

सौजन्य Indian Army ( News ) 

युद्धाला सामोरे जाण्यास सिद्ध ! – सैन्यदल प्रमुख

ते पुढे म्हणाले, ‘‘अलीकडील भू-राजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले आहे की, जेथे राष्ट्रीय हितसंबंध आहेत, तेथे देश युद्धाला सामोरे जाण्यास सिद्ध आहे. त्या दृष्टीने सैन्यदलाला आधुनिक, चपळ, अनुकूल, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्वावलंबी बनवणे, हे आपले मुख्य ध्येय आहे. राष्ट्रीय हिताचे रक्षण करतांना विविध प्रकारच्या वातावरणात पूर्ण क्षमतेने युद्ध जिंकता येईल, हाही आपला उद्देश आहे.