महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील नागरिकांना मतदार नावनोंदणीची संधी !

मुंबई – येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील पात्र नागरिकांना अजूनही मतदार म्हणून नावनोंदणी करण्याची संधी आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

वरील मतदारसंघांमध्ये लोकसभेसाठी ५ व्या टप्प्याचे म्हणजेच महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी होणार आहे. निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार अंतिम नामांकनाच्या १० दिवस आधीपर्यंत पात्र व्यक्तींना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. या मतदारसंघांमध्ये अंतिम नामांकनाची तारीख ३ मे आहे. त्यापूर्वी १० दिवस आधी म्हणजे २२ एप्रिलपर्यंत या मतदारसंघांतील नागरिकांना मतदारसूचीत नाव नोंदणी करता येईल.