प्रभु श्रीरामाने सीता स्वयंवरात तोडलेल्या धनुष्याचे पुढे काय झाले ?

शिवधनुष्य मोडल्यानंतर ते हाती धरलेले प्रभु श्रीराम

सीतामातेच्या स्वयंवराची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. सीतामातेचे वडिल राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती, ‘भगवान शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा जो जोडू शकेल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल.’ ते धनुष्य साक्षात् भगवान शंकराने राजा जनक यांना दिले होते. सीता मातेच्या स्वयंवरात अनेक राजे होते. त्यामध्ये रावणही होता; पण शिवधनुष्य उचलणे कोणत्याच राजाला शक्य झाले नाही. तेव्हा प्रभु श्रीरामांनी हे धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा लावतांना त्याचे तुकडे झाले. त्यानंतर श्रीराम आणि सीता यांचा विवाह झाला. सीतामाता अयोध्येला आली; पण त्या धनुष्याचे पुढे काय झाले ? ते धनुष्य कुठे आहे ? हे येथे देत आहोत.

धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की, भगवान राम जेव्हा शिवधनुष्याच्या प्रत्यंचा बांधत होते, तेव्हा धनुष्य अर्पण करतांना ते तुटले. धनुष्याचा एक तुकडा आकाशात, तर दुसरा तुकडा पाताळात गेला; परंतु तिसरा तुकडा जो धनुष्याचा मधला भाग होता, तो पृथ्वीवर पडला. पृथ्वीवर पडलेला धनुष्याचा मधला भाग आज नेपाळमध्ये आहे. हा तुकडा पडलेले ठिकाण आज ‘धनुष धाम’ मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर नेपाळमधील जनकपूरपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. आजही अनेक रामभक्त आणि भाविक शिवधनुष्याच्या त्या तुकड्याची पूजा करण्यासाठी तेथे श्रद्धेने जातात.

(साभार : दैनिक ‘सकाळ’)