निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे

नवी देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक घोषित होण्यापूर्वी, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण ७ सहस्र ५०२ कोटी रुपये जप्त केले. त्यानंतर १ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत देशभरातून ४ सहस्र ६५८ कोटी १३ लाख रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, मद्य, अमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १२ सहस्र कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. म्हणजेच प्रतिदिन सुमारे १०० कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. विशेष म्हणजे वर्ष २०१९ मधील संपूर्ण लोकसभा निवडणुकीत आयोगाने ३ सहस्र ४७५ कोटी रुपये जप्त केले होते. यावर्षी तर निवडणुकीला अद्याप दीड महिना शेष आहे.

१ मार्चपासून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये २ सहस्र ६८ कोटी ८५ लाख  रुपयांची औषधे, १ सहस्र १४२ कोटी ४९ लाख रुपयांच्या विनामूल्य वाटण्यात येणार्‍या  वस्तू, ५६२ कोटी १० लाख रुपयांचे मौल्यवान धातू, ४८९ कोटी ३१ लाख रुपयांचे मद्य आणि ३९५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.

१. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक ५३ कोटी रुपये, तेलंगाणात ४९ कोटी रुपये, महाराष्ट्रात ४० कोटी रुपये आणि कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये प्रत्येकी ३५ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

२. कर्नाटकात सर्वाधिक १२४ कोटी ३ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यानंतर बंगालमध्ये ५१ कोटी ७ लाख रुपयांची, राजस्थानमध्ये ४० कोटी ७ लाख रुपयांची, उत्तरप्रदेशमध्ये ३५ कोटी ३ लाख रुपयांची आणि बिहारमध्ये ३१ कोटी ५ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

३. गुजरातमधून सर्वाधिक ४८५ कोटी ९९ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यानंतर तमिळनाडूमध्ये २९३ कोटी २ लाख रुपयांचे, पंजाबमध्ये २८० कोटी ८१ लाख रुपयांचे, महाराष्ट्रात २१३ कोटी ५६ लाख रुपयांचे आणि देहलीत १८९ कोटी ९४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

काय आहेत निवडणुकीच्या काळातील आचारसंहितेचे पैशांच्या संदर्भातील नियम ?

१. विमानतळावर १० लाख रुपयांपर्यंतची रोकड आणि १ किलोपर्यंतचे सोने नेण्यास अनुमती आहे. यापेक्षा अधिक रोकड किंवा सोने असल्यास ‘ते कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा उमेदवाराचे नाही’, याची निश्‍चिती करण्यासाठी पडताळणी पूर्ण होईपर्यंत जप्त केले जाऊ शकते.

२. एखाद्या वाहनात १० लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आढळल्यास ती जप्त केली जाऊ शकते. ‘ही रोकड कोणत्याही पक्षाशी किंवा उमेदवाराशी संबंधित नाही’, हे कागदपत्रांद्वारे दर्शवल्यास ती जप्त केली जात नाही.

३. राजकीय पक्षाचा उमेदवार किंवा कार्यकर्ता याच्या वाहनात ५० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रोख किंवा १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक किमतीची दारू, तसेच अमली पदार्थ, शस्त्रेे किंवा भेटवस्तू आढळल्यास जप्त केले जाते.\

संपादकीय भूमिका 

जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे  किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते ! अशा निवडणुकीत जिंकणारे उमेदवार आणि राजकीय पक्ष हे पैसे पुन्हा मिळवण्यासाठी, तसेच पुढील निवडणूक लढवण्यासाठी भ्रष्टाचार करतात, यात आश्‍चर्य ते काय ?