मिरज, १२ एप्रिल (वार्ता.) – ‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विहिंप, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मप्रेमी, भाविक आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.
या शोभायात्रेचा प्रारंभ मैदान दत्त मंदिर येथून होऊन श्रीकांत चौक, सराफ कट्टा, गणेश तलाव या मार्गाने गर्डर विठ्ठल मंदिर येथे यात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत हलगी, भगव्या ध्वजासह पारंपरिक गुढी, भगवे झेंडे, वाजंत्री, झांजपथक, चंद्ररथ आणि त्यामध्ये श्रीरामाची भव्य भूर्ती, हिंदु साम्राज्यदिन रथ, पालखी यांचा समावेश होता. यात्रेतील भगवे ध्वज आणि सर्व हिंदुत्वनिष्ठांनी भगवी टोपी परिधान केली होती, तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि भगवी वस्त्रे परिधान केली होती.
बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि राष्ट्रपुरुष यांचा वेश परिधान केला होता. मैदान दत्त मंदिरासमोर भव्य आणि सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. शोभायात्रेतील मान्यवरांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यात्रा चालू असतांना भजनही करण्यात आले. ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.