भीलवाडा (राजस्थान) येथील ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’मध्ये तणावमुक्तीवर मार्गदर्शन
भीलवाडा (राजस्थान) – खरे तर आजच्या विषम परिस्थितीत न घाबरता संकल्पाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत. अशा वेळी सकारात्मक विचारांमध्ये राहून मनाची शक्ती प्रबळ केल्यास आपल्यासमोर पर्वताप्रमाणे कितीही ध्येय असले, तरी आपण ते सहज प्राप्त करू शकतो. त्यामुळे परिस्थितीवर नाही, तर आपल्या दृष्टीकोनावर तणाव निर्मूलन अवलंबून आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’मध्ये ‘तणावमुक्ती आणि संतुलन जीवनाचे रहस्य’, या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या व्याख्यानाला ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’तील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी असे १०० हून अधिक जण उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ताण का निर्माण होतो ? त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि तणाव निर्मूलन करण्यासाठी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक उपाययोजना कोणत्या कराव्यात ? यांविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आशिष सिंघल यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ‘एस्टेक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संचालक डॉ. के.सी. तोतला यांचे सहकार्य मिळाले.