श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता होणार श्रीरामललाचा सूर्यतिलक अभिषेक !

‘आयआयटी रुडकी’ने केलेली तांत्रिक चाचणी यशस्वी !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येत्या श्रीरामनवमीला, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी सूर्याची किरणे श्रीराममंदिरात श्रीरामललाचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणे’द्वारे (यंत्र आणि प्रकाश यांच्या संयुक्त यंत्रणेद्वारे) श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे गाभार्‍यात पोचतील. येथे किरणे आरशातून परावर्तित होतील आणि रामललाच्या कपाळावर ७५ मिलिमीटर आकाराच्या गोल तिलकाच्या रूपात ४ मिनिटे थेट दिसतील.

सौजन्य : TV9 Bharatvarsh

‘आयआयटी रुडकी’च्या परिश्रमाने हा सूर्यतिलक साकार होत आहे. मंदिराचे पुजारी अशोक उपाध्याय यांनी यासंदर्भात सांगितले की, गाभार्‍याच्या तिसर्‍या मजल्यावर सूर्यतिलकसाठी वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत.

अशी सिद्ध करण्यात आली आहे यंत्रांची मांडणी !

प्रकल्प शास्त्रज्ञ देवदत्त घोष म्हणाले की, ही मांडणी सूर्याचा मार्ग पालटण्याच्या तत्त्वांवर आधारित असून यात एक ‘रिफ्लेक्टर’ (परावर्तक), २ आरसे, ३ लेन्स (भिंग) आणि पितळी पाईप वापरण्यात आला आहे. सूर्यकिरणे छतावर बसवण्यात आलेल्या रिफ्लेक्टरवर पडून पहिल्या आरशावर येतील. तेथून ते खालच्या दिशेला परावर्तित होतील. प्रत्येक मजल्यावर एक लेन्स असून पितळी पाईपच्या माध्यमातून दुसर्‍या आरशापर्यंत पोचतील. दुसरा आरसा गाभार्‍यात श्रीरामललाच्या मस्तकासमोर असेल. याद्वारे सूर्यकिरणे श्रीरामललाला अभिषेक करतील.