सुश्री (कु.) सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) : ‘माझी आई रुग्णाईत आहे. आमच्या घरी सर्वकाही उपलब्ध आहे; पण घरी आईला जेवण नीट जात नव्हते, तसेच समाधानही वाटत नव्हते. ती २ दिवस रामनाथी आश्रमात रहायला आली. तेव्हा तिला जेवण गेले आणि झोपही चांगली लागली. आश्रमात आल्यावर तिला पुष्कळ समाधान मिळाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हेच आश्रमात रहाण्याचे महत्त्व आहे. आश्रमात सर्वजण साधनेसाठीच एकत्र आलेले असतात. येथे संतांचे वास्तव्य असते आणि आश्रमाभोवती देवतांचे संरक्षककवचही असते. या सर्व गोष्टींमुळे आश्रमातील वातावरण पुष्कळ सात्त्विक आणि चैतन्यमय झालेले असते. आश्रमातील चैतन्यामुळे साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर लाभ होेतो. यासाठीच आपण त्यांना आश्रमात येण्यास सांगतो.
साधक घरी नामजप, स्वयंसूचनांचे सत्र आणि आध्यात्मिक उपाय, असे साधनेचे प्रयत्न करत असले, तरी आश्रमातील चैतन्यामुळे त्यांना मनाची स्थिरता अनुभवता येऊन आंतरिक समाधान अन् शांती मिळते. अनेक साधक आश्रमात भावावस्था आणि निर्विचार अवस्था यांचा अनुभव घेतात. साधकांनी स्वत:च्या साधनेसाठी आश्रमजीवनाचा लाभ करून घ्यावा !’