अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अयोध्या येथे आल्या होत्या. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. दूरदृष्टीने विचार करणार्‍या आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी पुष्कळ सजवली होती. आम्ही गाडीतून जातांना ती सर्व सजावट पहात होतो. लोकांना बसण्यासाठी केलेल्या एका ठिकाणी बाजूला तात्पुरते शौचालयही बनवले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला तेथील सजावट आणि व्यवस्था यांची छायाचित्रे काढण्यास सांगितली. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘भविष्यात आपल्याला यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित करावे लागतील. तेव्हा आपल्याला या सर्व चिंतनाचा लाभ होईल.’’

१ आ. अहं नसणे : श्री रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर आम्हाला अयोध्येहून लक्ष्मणपुरी येथे जाण्यासाठी निघायला उशीर होत होता. निघण्यापूर्वी आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो. प्रसादासाठी लोकांची मोठी रांग लागली होती.श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘मी प्रसादाच्या रांगेत उभी रहाते, म्हणजे वेळ वाचेल.’’ त्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींच्या रांगेत उभ्या राहिल्या.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
श्री. विश्वनाथ कुलकर्णी

२ अ. समाजातील लोकांशी सहजतेने जवळीक साधणे : या कार्यक्रमानिमित्त उत्तरप्रदेश राज्याचे काही अधिकारी आमच्या समवेत होते. आम्ही एका मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर आम्हाला तिथे दुसर्‍या काही अधिकारी व्यक्ती भेटल्या. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वतःहून त्या अधिकार्‍यांची ओळख करून घेतली आणि त्यांच्याशी बोलून त्यांनाही आपलेसे करून घेतले.

२ आ. वातावरण आनंदी ठेवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ ! : अयोध्येतील सनातनच्या साधिका श्रीमती मिथिलेश वेद यांच्या घरी आम्ही निवासाला होतो. तेव्हा उत्तरप्रदेश सरकारचे ९ अधिकारी आमच्या समवेत दोन्ही वेळा जेवायला येणार होते. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्वांना सतत हसवत ठेवून वातावरण हलके करून कुणालाही कसलाही ताण येऊ दिला नाही.

२ इ. प्रसंगात सतर्कतेने मार्ग काढणे : सोहळा झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे मार्ग ओलांडून गाडीपर्यंत लवकर पोचणे शक्य नव्हते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘समोर दुसरे फाटक दिसत आहे, तिथल्या लोकांना विचारले, तर ते आपल्याला मार्ग ओलांडण्यासाठी वाट करून देतील.’’ मला ‘तिथून काही साहाय्य मिळेल’, असे वाटले नाही; तरीही मी समोरच्या दुसर्‍या फाटकावरील लोकांकडे जाऊन त्यांना विचारले. त्यांनी त्वरित आम्हाला वाट करून दिली. त्यामुळे आम्हाला लगेच गाडीपर्यंत पोचता आले.

२ ई. साधकांना परिपूर्ण सेवा करण्यास शिकवणे : एक साधक आमची छायाचित्रे काढतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्हाला ‘प्रकाश व्यवस्थित येईल’, अशा ठिकाणी उभे राहून छायाचित्रे काढायला सांगितली. तसे केल्यावर छायाचित्र चांगले आले.’

– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४३ वर्षे), वाराणसी, (१९.२.२०२४)