इंदूर (मध्यप्रदेश) – येथील कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना महिलेला ‘कुंकू लावणे विवाहित महिलेचे धार्मिक कर्तव्य असून ती लग्न झालेल्या महिलेची निशाणी आहे’, असे सांगत तिला कुंकू लावून त्वरित पतीकडे जाण्याचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाने आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला. ‘विवाहितेने कुंकू न लावणे, ही क्रूरता ठरेल’, असे गुवाहाटी उच्च न्यायालयाने म्हटले होते.
१. इंदूर येथील एका व्यक्तीने वैवाहिक संबंध पूर्ववत् करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. याचिकाकर्त्याने दावा केला होता की, गेल्या ५ वर्षांपासून त्याची पत्नी कोणतेही कारण नसतांना त्याच्यापासून विभक्त रहात आहे. आता तिने कुंकू लावणेही बंद केले आहे.
२. ‘पती अमली पदार्थांचे सेवन करून करून हुंड्यासाठी छळ करतो’, असा आरोप विवाहित महिलेने केला होता. यावर या कौटुंबिक न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला.
३. जेव्हा महिला न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी आली होती. त्या वेळीदेखील तिने कुंकू लावले नव्हते. न्यायालयाने तिला याविषयी विचारणा केली असता तिने चूक मान्य केली. यानंतर न्यायालयाने निर्णय देत या महिलेला कुंकू लावून पतीकडे रहाण्याचा आदेश दिला.