मलंग म्हणजे मुसलमान फकीर नव्हे ! भगवान दत्तात्रेयांनी अनेकांना मलंग रूपात दर्शन दिल्याचे उल्लेख वाचनात येतात आणि लोक चक्क मलंगचा अर्थ मुसलमान फकीर असाच सारख्या वेशामुळे गृहित धरतात. नागपूर विद्यापिठातील थोर संशोधक डॉ. म.रा. जोशी यांनी या ‘मलंग’ शब्दावर प्रचंड संशोधन करून सर्व इस्लामी देश आणि भाषा यांमधून हा शब्द अन् त्याचा अर्थ शोधला; पण हा शब्द अथवा ही संकल्पना कोणत्याही इस्लामी देश अथवा भाषेत आढळून आली नाही. अधिक संशोधनात केवळ काश्मिरी भाषेत आणि त्यांच्या लोकात हा शब्द प्रचलित असून त्याचा अर्थ मुसलमान फकीर नसून ‘हिंदु योगी’ असा आहे. या शब्दाची व्युत्पत्ती ‘मल्ल + अंग = मलंग’, अशी आहे. बर्फाच्छादित प्रदेशात योग साधना करणारे योगी स्वतःच्या शेजारी सतत धुनी पेटवून त्यातील भस्म (राख) आपल्या अंगावर (मल्ल) लावत असतात आणि थंडीपासून शरिराचे रक्षण करत योग साधना करतात. ही धुनी नीट करण्यासाठी लांब चिमटा, फळे गोळा करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी कठीण कवचाच्या फळाचाच बनवलेला कटोरा वापरतात अन् काश्मिरी लोकांसारखा (फकीर सदृश्य) वेष करतात. त्यामुळे लोक मलंग, म्हणजे फकीर असाच अर्थ समजतात. डॉ. म.रा. जोशी यांनी अनेक पुराव्यांनी हे सिद्ध केले आहे.
– श्री. विलास चारठाणकर, इंदूर, मध्यप्रदेश.
(साभार : ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’, लेखक : अ.ना. देशपांडे आणि डॉ. म.रा. जोशी, खंड-३, आवृत्ती दुसरी, व्हिनस प्रकाशन.)