भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांना खासदारकीची उमेदवारी !
बीड – खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पक्षाने मला खासदारकीचे तिकीट दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे; पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ काही वाट पहाण्याची आवश्यकता पडणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी १४ मार्च या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. सौ. पंकजा मुंडे यांना खासदारकीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मुंडे भगिनींनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
सौ. पंकजा मुंडे-पालवे पुढे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत; पण आमच्या दोघींपैकी कुणाला तरी तिकीट मिळेल, अशी अपेक्षा नक्की होती. त्यात माझे नाव घोषित झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही. आम्हा दोघी बहिणींमध्ये चांगला समन्वय आहे.
या वेळी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, पंकजाताईच माझ्या नेत्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणताही समुपदेश देण्याची आवश्यकता नाही. सक्षम, अभ्यासू नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेले आहे. माझ्यापेक्षा त्यांनी अधिक काम केंद्रातील नेतृत्वासमवेत केलेले आहे. त्यामुळे लोकसभेत सर्वाधिक विजय हेच माझे ध्येय असेल.