आजार आणि पथ्यापथ्य

‘पथ्य पाळायचे असेल, तर औषधांचा काय उपयोग ? किंवा आयुर्वेद औषधे घ्यायची, म्हणजे केवळ भरपूर पथ्यच पाळायला लागते, नकोच त्यापेक्षा ! औषधे नावाला असतात, आहार आणि पथ्य पालन करायला लागत असेल, तर तसेही रुग्ण बरा होईलच की, औषधे काय करतात नक्की ?’, असे प्रश्न लोक वेगवेगळ्या उद्देशाने विविध माध्यमांतून किंवा निर्मळ कुतूहलाने विचारत असतात. शांतपणे हा विचार केला, तरी या सर्व प्रश्नातील फोलपणा लक्षात येईल.

वैद्या स्वराली शेंड्ये

पथ्य पाळणे आणि औषध घेण्याचे महत्त्व ! 

एखाद्या आजारात, विशेषतः पोटाची तक्रार असतांना त्या विशिष्ट गोष्टींना चिघळवू नये किंवा त्रास होऊ नये, असे पथ्य हे कुठल्याही औषध पद्धतीत औषधांसह पाळायला लागतेच. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल, तर तिला आपण मुद्दाम हात लावून चिघळवत नाही. तिला जपतो आणि बरी व्हायला वेळ देतो. त्याप्रमाणे त्या व्याधीनुसार भरमसाठ नाही; पण विशिष्ट पथ्य काही काळ पाळणे हे आवश्यक असते. उदाहरणार्थ एखाद्या जागी जेव्हा काही लोक कचरा टाकायला प्रारंभ करतात. त्या जागी तो कचरा हळूहळू साठायला लागतो. जेव्हा आपण तेथील कचरा साफ करायला प्रारंभ करतो, तेव्हा नवीन कचरा तिथे लगेच टाकला जाऊ नये, याची दक्षता घेतो, अन्यथा या दुष्टचक्रात पूर्ण कचरा कधीच साफ होणार नाही. शरिरात परत हे दोष वाढून आजार होऊ नये, हेच तर असते पथ्याचे काम !

आयुर्वेद औषधेही वर सांगितल्याप्रमाणे शरिरातील अनावश्यक आणि नको त्या ठिकाणी वाढलेला दोषरूपी कचरा साफ करायचे काम करतात. औषधे घेतल्यानंतर लगेच दिसू लागणारा लाक्षणिक भेद, शरिरात तेच तेच आजार परत होऊ नये, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे; अवयवाच्या ठिकाणी परत आजार होऊ नये, यादृष्टीने बळ देणे, या सर्वच बाजूने आयुर्वेद काम करतो. औषधांचे काम होईपर्यंत नवीन दोषरूपी कचरा तिथे जमा होऊ न देण्याचे काम पथ्य करते. दोष आणि रोग अल्प प्रमाणात असेल, तर केवळ पथ्यावरही रुग्ण बरा होतो. त्यानंतर मग प्रतिदिनची दिनचर्या आणि ऋतुचर्या बर्‍यापैकी पाळली, तर मुळात परत परत ही वेळ फारशी येत नाही.

चांगला व्यायाम आणि आटोक्यातील वजन असेल, तर कधी तरी होणारे अपथ्य सहन करण्याची शरिराची क्षमताही उत्तम असते. काही व्याधी अवस्थांचा अपवाद वगळता बर्‍याच रोगांमध्ये अशा पद्धतीत औषधे तात्काळ आणि पथ्य लगेच, तसेच दूरगामी काम करत असतात. सध्याचे पालटती बियाणे, फवारणी केलेला भाजीपाला, प्रदूषण, पालटते पाणी या न टाळता येण्यासारख्या अपथ्यांमध्ये स्वतःचा आळस आणि कंटाळा यांमुळे भर पडू दिली नाही, म्हणजे औषधांचे कामही सोपे होते.

– वैद्या स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद (साभार : फेसबुक)