प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. स्त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा मोठा !
‘स्त्री ही श्रेष्ठतम शक्ती आहे. समान हक्क नव्हे, तर स्त्रीचा हक्क पुरुषापेक्षा अधिक आहे. ‘स्त्री श्रेष्ठ आहे’, असे धर्म सांगतो. मनु नारीपूजा करायला सांगतो; कारण स्त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा मोठा आहे.
२. संन्यासी मुलाने वडिलांना नव्हे; पण मातेला नमस्कार करणे आवश्यक !
‘माता ही पित्यापेक्षा सहस्रो पटींनी श्रेष्ठ आहे’, असे मनूच सांगतो. मुलाने जर संन्यास घेतला, तर त्याचे नाते संपले. त्यानंतर माता-पिता हे नाते रहात नाही. पित्यानेच मुलाला नमस्कार करायचा, मुलाने नाही. संन्यासी मुलाने मातेला मात्र नमस्कार केला पाहिजे. कुठलेही धर्मकार्य पत्नीविना होतच नाही.
३. पत्नी ही गृहिणी, सखी, शिष्या आणि सचिव !
धर्म असेल, तर जीवन-संसार सुखाचा होईल. धर्माविना सुखशांती केवळ अशक्य आहे. दोरीच्या वाळूने आकाश बांधल्यासारखे असंभाव्य ! ‘मनु’ पुत्राकरताच विवाह करायला सांगतो. ‘पुत्र झाला की, पत्नी माता होते’, असे मनु सांगतो. पत्नी ही गृहिणी आहेच; पण सखी, प्रिय शिष्या आणि सचिव आहे. पतीने मिळवलेली संपत्ती, धन आणि वेतन सगळे पत्नीच्या हाती द्यावे. ‘पत्नीने घर चालवायचे’, असे मनु सांगतो. मनु असेही सांगतो की, जेथे स्त्रीचा अपमान, तिरस्कार होतो, ते घर उद़्ध्वस्त होते.
४. धर्माचरणी महाराणी अहिल्याबाईंचे अद्वितीय उदाहरण !
धर्माविना कुठलेही, कसेही, कोणतेही शासन स्मृती, सुख-शांती निर्माण करूच शकणार नाही. सगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत. स्त्री जर धार्मिक असेल, तर अधर्माकडे झुकण्याचे किंवा वळण्याचे पतीचे धाडस होणार नाही. महाराणी अहिल्याबाईंचा पती विलक्षण व्यसनी होता. तो मद्य, मदिराक्षीत अखंड डुंबलेला आणि हवे ते अत्याचार करणारा होता. अहिल्याबाई या परमधार्मिक आणि परमसहनशील होत्या. पतीशी बोलायचे, त्याला काही सांगायचे, असे त्या काळच्या पत्नींचे धाडस होत नव्हते. त्या काळी पती वाघासारखा त्यांच्या अंगावर धावून यायचा. अशा काळातही अहिल्याबाईंचा शब्द मोडणे मात्र पतीला अशक्य व्हायचे. त्यांच्यासमोर बोलण्याची त्याची प्राज्ञा (योग्यता) नव्हती. तो त्यांच्यापुढे पूर्ण लीन असायचा. शक्ती जर असेल, तर ती धर्मातच आहे. अन्य शक्ती तकलादू आणि कृत्रिम आहेत.
५. धर्माचरण करण्याचे महत्त्व
धर्म अनुसरणार्या पत्नीसमोर सहनशक्ती, तितिक्षा (धैर्य) असणारा पती वाकलाच पाहिजे. तसे घडत नसेल, तर अंतर्मुख व्हावे. कुठे चुकते, ते शोधून काढावे. अधिकाधिक धर्म अनुसरावा. धर्म अनुसरणारा माणूस जगाला प्रिय असतोच, तसेच तो देवतांनाही आवडतो.
६. २५ वर्षे संसार टिकणे, हे आज परमदुर्लभ !
आज ‘धर्म’ शेष राहिला नाही. समान हक्क आहेत. केव्हाही, कुणालाही पतीपासून वेगळे होण्याचा हक्क आहे. लाखो घटस्फोट होतच आहेत. शासनाने केलेले आजचे सगळे स्त्रीविषयक कायदे स्त्रीला पुरुषापेक्षाही श्रेष्ठत्व देणारे आहेत. २५ वर्षे संसार करणार्या जोडप्यांचा सन्मान करण्याची घटना पुण्यात घडली ! २५ वर्षे संसार टिकणे, हे आज परमदुर्घट आणि परमदुर्लभ झाले आहे.
७. आजचे विश्व हे स्त्रीसत्तेचे विश्व !
आज स्त्री सामाजिक आणि राजकीय सत्ताधीश आहे. सामाजिक आणि राजकीय पक्ष, संस्था, कायदेमंडळ अन् मंत्रीमंडळ येथेही स्त्रिया आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही त्या आहेत. आज स्त्रियांचे राज्यच आहे. आजचे विश्व हे स्त्रीसत्तेचे विश्व आहे; पण तरीही स्त्रियांचे दुःख, हुंदके संपलेले नाहीत. संपणार नाहीतच; कारण धर्म आणि शास्त्र यांचे आचरण नाही. कशाचेही विधिनिषेध नाहीत. धर्माविना कुठलेही, कसेही आणि कोणतेही शासन स्मृती, सुख-शांती निर्माण करूच शकत नाही. सगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२१)