श्रेष्ठ प्रतीचा लोकसंग्रह करणारे ‘जनसंघटक’ महाराणा प्रताप !

आज महाराणा प्रताप स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

मेवाडच्या उदयसिंहांच्या पश्चात त्यांचा ज्येष्ठ आणि पराक्रमी पुत्र ‘प्रताप’ याचा वर्ष १५७२ मध्ये राज्याभिषेक झाला, तेव्हा तो ३२ वर्षांचा होता (जन्म ९.५.१५४०). अर्थात् त्यापूर्वी अनेक वर्षे प्रताप यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वामुखी झालेल्या होत्या. राजपूत राजघराण्यातील तत्कालीन परंपरेप्रमाणे प्रताप यांना तिरकमठा (धनुष्यबाण), भाला, तलवार आणि बंदूक चालवण्याचे उत्तम शिक्षण मिळाले होते. मोठेपणी राणा प्रताप यांचा असामान्य लढवय्या म्हणून मोठा नावलौकिक झाला, हे सर्वज्ञात आहे.

अकबराची राजपुतान्यातील राजकारणे वर्ष १५६१ पासून चालू झाली. प्रताप यांनी राजकुळातून बाहेर पडून आपल्या राज्यात सतत भ्रमंती केली. त्यांनी मुलुखातील किल्ले, टेकड्या, दर्‍याखोर्‍या आणि नदीनाले इत्यादींची खडान्खडा माहिती करून घेतली. रयतेत समाजाच्या हेतूने जनशक्ती जागृत करून लष्कर भरतीही केली. त्यासाठी त्यांनी सहसा त्यापूर्वी कुणी न मिसळलेल्या भिल्लांच्या प्रदेशातील टोळीवाल्यांशीही चांगले संधान बांधले. त्यामुळे भिल्लांमध्ये त्यांना ‘किळा’, म्हणजे मुलगा अशा जिव्हाळ्याने मानले जाऊ लागले. पुढे सत्तेवर आल्यावर राणा प्रताप यांनी आपल्या राजचिन्हाच्यामध्ये कुलदैवत एकलिंगजी, त्याच्या एका बाजूला स्वतः आणि दुसर्‍या बाजूला भिल्लाची आकृती गोंदवली. यावरून ते किती श्रेष्ठ प्रतीचे लोकसंग्रह साधणारे ‘जनसंघटक’ होते, हे दिसून येते. म्हणूनच त्याला प्रदीर्घ लढ्यात आपल्या प्रजेची पूर्ण साथ लाभली.

आपल्या या दृढ श्रद्धा आणि विश्वास असलेल्या झुंजार राजाला प्रजेने शेवटपर्यंत सर्वतोपरी प्रतिसाद दिला. त्याच्यासमवेत हालअपेष्टा स्वयंस्फूर्तीने सोसल्या. हे राणा प्रताप यांचे असामान्य कर्तृत्व मानले पाहिजे.

– श्री. यशवंत जोगळेकर, ठाणे (प.)

(साभार : साप्ताहिक ‘स्वातंत्र्यवीर’, जानेवारी २००६)