सातारा येथील शिवतीर्थ परिसर होणार मांसविक्री मुक्त !

सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला शिवतीर्थ (पोवई नाका) परिसर १९ फेब्रुवारी २०२४ या दिवसापासून कायमस्वरूपी मांसविक्री मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवतीर्थ परिसरामध्ये मांस खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावून मांसविक्री केल्यामुळे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती मूर्ती परिसर, तसेच भूविकास बँकेजवळील हुतात्मा स्मारक परिसर यांचे पावित्र्य भंग पावत आहे. ही दोन्ही ठिकाणे  शहरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान आहेत. या दोन्ही स्मारकांचे पावित्र्य जपण्यासाठी या परिसरामध्ये होत असलेली मांसविक्री कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६९ अन्वये आणि सार्वजनिक रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रक्षेपण, अडथळे आणि अतिक्रमणे कलम ३७४ अन्वये खाद्यपदार्थ सिद्ध करण्यावर नियंत्रण या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांसमवेत नागरिकांनीही या दोन्ही स्मारकांचे पावित्र्य जपावे.