पनवेल – महापालिकेकडून मलनिःसारण केंद्रांचे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन पनवेल आणि खारघर येथील ६ केंद्रांच्या नूतनीकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वाहिन्या आणि विद्युत् यांची यंत्रणा जुनी झाल्याने या केंद्रांची कार्यक्षमताही अल्प झाली आहे, तसेच एकूणच केंद्रातील सर्व खोल्यांची दुरवस्था झाली आहे. ३५ वर्षांपूर्वी सिडकोने ही मलनिःसारण केंद्रे बांधली होती आणि पनवेल महापालिकेला हस्तांतरण केली होती.
मलनिःसारण केंद्राच्या नूतनीकरणामुळे मलवाहिन्यांमध्ये मैला तुंबून रहाणे, वारंवार वाहिन्या तुंबणे आदींमुळे नागरिकांना होणारे त्रास अल्प होतील. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीही अल्प होतील, असे संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, संबंधित परिसराच्या सुशोभीकरणासह एकूण ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सिडको वसाहतींमध्ये अनेक जुन्या यंत्रणा पालटण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने यंत्रणा विकसित करण्यात येणार आहेत.