प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
धर्माप्रमाणे आचरण केल्यासच राष्ट्र खर्या अर्थी अत्यंत प्रगत, समाधानी, समृद्ध आणि वैभवसंपन्न होऊ शकते !
‘धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे; कारण मुळात धर्माची संस्थापना मानवाच्या व्यष्टी (व्यक्ती) आणि समष्टी (समाज) जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठीच केली गेली आहे. ‘सर्वांगीण विकास’ ही गोष्ट फार गुंतागुंतीची आहे. एका अंगाचा विकास होत असतांना दुसर्या अंगाची हानी किंवा संघर्ष होण्याची फार शक्यता असते. यासाठी प्रत्येक घटकाच्या मर्यादा अत्यंत सूक्ष्मपणे निश्चित केल्या पाहिजेत.
धर्मात सांगितलेल्या गोष्टी काळजीपूर्वक आणि दूरगामी परिणाम विचार करणार्या !
धर्माचे स्वरूप प्रामुख्याने विधीनिषेधात्मक म्हणजे काय करावे ? आणि काय करू नये ? या संदर्भात आहे. धर्माच्या विधीनिषेधांकडे दुर्लक्ष करून वाटेल तसे वागल्याने काय होईल ? तसे करणार्यांची हानी होईल. आणखी एक गोष्ट नीट ध्यानात घेतली पाहिजे की, मानवी जीवनावर प्रयोग करणारेही मानवच आहेत. त्यामुळे एका पिढीवर केलेल्या प्रयोगाचे बरे-वाईट परिणाम लगेच ठरवणे घातक ठरू शकते. त्यासाठी प्रयोग करणार्यांच्या काही पिढ्या सातत्याने प्रयोग करत राहून त्याचे निष्कर्ष नीट नोंदवून, सुसंगत पडताळून मगच ठरवावे लागतात.
आपल्या धर्मात या गोष्टी फार काळजीपूर्वक आणि होणारे दूरगामी परिणाम यांचा नेमका विचार करून स्वीकारलेल्या दिसतात. अनेक द्रष्ट्या ऋषींनी पिढ्यानपिढ्या प्रयोग करून धर्मविषयक सिद्धांत बनवले आहेत. ते चूक किंवा त्याज्य ठरवतांना पुरेशा गांभीर्याने चिंतन करणे आवश्यक असते. आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून आपले राष्ट्र लक्षावधी वर्षे अत्यंत समाधानी, समृद्ध आणि वैभवसंपन्न राहिले होते, हा इतिहासही लक्षात घेतला पाहिजे.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, १९९८)