मनुस्मृतिनुसार दुष्कर्माची फळे !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘मनाने जीव जे अशुभ कर्म करतो, त्याचे फळ मनानेच भोगतो. वाणीने केलेल्या पाप-पुण्याचे फळ, वाणीद्वारा भोगतो. शरिराने केलेले पाप-पुण्याचे फळ, शरिरानेच भोगतो; म्हणून मानसिक, वाचिक, कायिक अशुभ कर्मे सोडावीत.

१. अशुभ मानसिक कर्मे 

परधन अन्यायाने घेण्याचे चिंतन करणे, ब्राह्मणाधिकांच्या वधाचा विचार करणे, परलोक नाही आणि देह हाच आत्मा आहे, असा आग्रह धरणे, ही ३ अशुभ मानस कर्मे आहेत.

२. वाणीची अशुभ कर्मे

अप्रिय आणि असत्य भाषण करणे, कठोर भाषण करणे, एखाद्याच्या मागे त्याचे दोष सांगणे; राजा, स्वदेश किंवा आपले नगर यांच्यासंबंधी निरर्थक आणि असत्य अफवा उठवणे.

३. कायिक अशुभ कर्मे

अन्यायाने, बळजोरीने न दिलेली वस्तू घेणे; धर्मशास्त्रात न सांगितलेली हिंसा करणे, परस्त्री गमन करणे.

मन, वाणी आणि शरिराने केलेले शुभ अन् अशुभ कर्म सुख वा दुःखात्मक फळ देते. पुढच्या जन्मी कर्मानुसार त्याला उत्तम (मनुष्य), मध्यम (पशू), अधम (पक्षी) जन्म मिळतो.’

–  प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’ ऑक्टोबर २०२३)