भारतीय कुटुंबव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन यांपासून असमाधानी आणि असुरक्षित बनत जाते, याची जाणीव आता व्हायला लागली आहे.

प.पू. स्वामी वरदानंद भारती

१. स्त्री धर्माची उपयुक्तता

आपल्या धर्मामध्ये कुटुंबाच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थेचे उत्तरदायित्व मुख्यतः कुटुंबातील गृहिणीवर आहे. आज स्त्रीमुक्तीच्या भ्रामक विचारांच्या वावटळीत हे समजणे अवघड अन् कदाचित् अशक्य वाटत असेल; पण ‘गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ।’, म्हणजे ‘गृहिणीविना असलेले घर हे जणु वनाप्रमाणे असते.’ स्त्रीजीवनाची, स्त्रीला ‘पतिव्रता धर्म’ म्हणून सांगितलेल्या धर्माची उपयुक्तता या कुटुंबाचे स्वास्थ्य, समाधान, अंतर्गत संरक्षण यासाठीच आहे.

२. कुटुंबातील सर्वांनी स्वतःच्या धर्माचे पालन करणे महत्त्वाचे !

कर्तापुरुष सन्नीतीच्या मार्गाने धनप्राप्तीला (‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ।’ (तुकाराम गाथा, अभंग २८५४,ओवी १) म्हणजे योग्य मार्गाने धन मिळवावे आणि बाह्यसंरक्षणाला उत्तरदायी आहे. अर्थात् ‘केवळ गृहिणीवर, स्त्रीवरच सर्व दायित्व आहे’, असा अर्थ नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपापले धर्म, म्हणजेच पिता, माता, पुत्र, पुत्री, भाऊ, कर्त्यासाठी गृहस्थ, वृद्ध ज्येष्ठांसाठी वानप्रस्थ हे धर्म नेटकेपणाने सांभाळले पाहिजेत आणि सांभाळण्यासाठी आधी नीट समजून घेतले पाहिजेत.

३. पूर्वीच्या कुटुंबव्यवस्थेचा लाभ

आपल्याकडच्या पूर्वीच्या कुटुंबव्यवस्थेत ज्येष्ठ वृद्ध सदस्य (आजोबा, आजी इत्यादी) हे आपल्या अनुभवातून प्रत्येक घटकाला त्यांचे त्यांचे आचारधर्म शिकवत असत. कदाचित् कुणी चूक केली, तर वत्सलतेने क्षमाशील वृत्तीने काही योग्य ते पालट करत आणि ‘पुन्हा तसे होणार नाही’, याची काळजी घेण्यास सांगत असत, तसेच नेमके काय चुकले, तेही स्पष्ट करत असत. आज पाश्चात्त्य जीवनपद्धतीच्या भ्रामक आकर्षणाने आपण ही व्यवस्था मोडित काढल्यासारखी आहे.

४. धर्माच्या ‘विशेष अधिकार आणि उत्तरदायित्व’ या दोन अंगांसह ‘कर्तव्य आणि सन्नीती’ शिकवणे आवश्यक !

याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी एक घडलेला प्रसंग थोडक्यात देत आहोत. महानगरात रहाणार्‍या एका गृहस्थाला त्याने त्याच्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नये, असे सांगण्याचा प्रसंग आला. त्या गृहस्थाने शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि म्हणाला, ‘तुमचे सगळे योग्य आहे; परंतु यांनीच मला लहानपणी त्यांच्या ‘करिअर’च्या (भविष्य उज्ज्वल करण्याच्या) नादात पाळणाघरात ठेवले होते. आता माझ्या सोयीसाठी मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो म्हटले, तर काय चुकले ?’ ‘सडेतोड म्हणता येईल’, असे निरुत्तर करणारे हे उत्तर असले, तरी ही मानसिकता आपल्या धर्माच्या शिकवणुकीची नाही.

तर्क कुटुंबाला स्वास्थ्यापासून दूर नेतात. यासाठी धर्माच्या ‘विशेष अधिकार आणि उत्तरदायित्व’ या दोन अंगांसह ‘कर्तव्य आणि सन्नीती’ या उरलेल्या २ गोष्टींची जाण ठेवली, तर काय योग्य अन् अयोग्य याचा निर्णय करता येतो. त्याने कुटुंब समाधानी आणि स्वस्थ होते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. वर्ष १९९८)