‘केक’चा वाढता प्रभाव !

आनंद मग तो कुठलाही असो चारचौघांत साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेण्यासाठी मिठाई वाटून इतरांचेही तोंड गोड करण्याची पद्धत अगदी पुराणकाळापासून चालत आलेली आहे. पूर्वीचे राजे, महाराजे आनंदाच्या क्षणी प्रजेला हत्तीवरून मिठाई वाटत असत. मिठाईचे शेकडो प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. देवीदेवतांच्या उत्सवांना नैवेद्य म्हणून ‘५६ भोग’ देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. उत्तर भारतात ही परंपरा आजही उत्साहाने जपली जाते. आनंदाचे क्षण हे साजरे करण्यासाठीच असतात. इतरांचे तोंड गोड करून आपला आनंद साजरा केल्याने त्यामध्ये इतरही सहभागी होतात, ज्यामुळे वातावरणात आनंदलहरी पसरून वातावरणही आनंददायी होते. त्यामुळे आनंद साजरा करण्याची प्रथा जगभरात सर्वच प्रांतांत दिसून येते.

सध्या मुलांना इंग्रजी किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये घातल्याने तिथेही हेच संस्कार होत आहेत. या बहुतांश शाळा, ख्रिस्ती संस्थांकडून चालवल्या गेल्याने तिथे ख्रिस्ती पंथांचे संस्कारच अधिक केले जातात. येथे आनंदाचे क्षण केक कापून आणि तो वाटून साजरे केले जातात. मुलांचे मन संस्कारक्षम असल्याने शालेय जीवनात आनंदाच्या क्षणी ‘केक’ खाण्याचा संस्कार हा नकळत होतोच. सध्या चित्रपट, मालिका यांमधूनही आनंदाच्या क्षणी मोठ्या प्रमाणात ‘केक’ खाण्याची दृश्ये दाखवली जातात. आनंदाचा क्षण मग तो नोकरी लागल्याचा असो किंवा नोकरीत पदोन्नती मिळण्याचा असो, साखरपुडा वा लग्न असो सर्वच ठिकाणी हे क्षण मद्यपान करून आणि केक कापून साजरे केले जातात. घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल असो वा बाळाचे बारसे, नोकरी लागणे, कर्ज मान्य होणे, नोकरीत पदोन्नती मिळणे, नोकरीत मनासारखे स्थानांतर होणे, नवीन घर किंवा गाडी घेणे, स्पर्धा जिंकणे कि लग्न ठरवण्याचा कार्यक्रम असो किंवा कुणाचे स्वागत असो, अशा अनेक प्रसंगी केक आणला जात आहे. आजकाल लग्न आणि साखरपुडा या वेळीही काहीही कारण नसतांना केक कापला जातो. आजचा तरुण आपले आनंदाचे क्षण मिठाई वाटून नव्हे, तर केक कापून साजरा करू लागला आहे. केक भारतियांच्या जीवनात अनिवार्य होऊ लागला आहे. नाक्यानाक्यावर केकची दुकानेही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आहारशास्त्रानुसार नेहमी ताजे अन्न खावे. आनंदाच्या क्षणी तर शिळे अन्न मुळीच खाऊ नये. भारतीय संस्कृतीनुसार शिजवलेल्या अन्नावर शस्त्र फिरवणे अशुभ मानले जाते आणि आनंदाच्या क्षणीच आपण नकळतपणे अशुभ कार्य करतो. आनंदाचे क्षण हे गोडधोड वाटून साजरे करण्याची आपल्या संस्कृतीतील संकल्पना कालबाह्य होऊ न देण्यासाठी सर्वांनीच विशेषतः गृहिणींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.