देवतांचे मंदिरच !

प्रतिकात्मक छायाचित्र

गोवा राज्यातील सर्व मंदिरांचे मिळून एक भव्य दिव्य ‘स्मारक मंदिर’ उभारण्याचा सरकारचा विचार असून यासाठी लवकरच कार्यवाहीला आरंभ होणार आहे. ‘अनेक भाविकांना असे करावेसे वाटत आहे’, असेही सांगण्यात आले. असे का हवे आहे ? याचा नेमका उद्देश स्पष्ट होत नाही. धर्मशास्त्र लक्षात न घेता कुणाला वाटते म्हणून असे करणे योग्य आहे का ? इथे काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. ‘स्मारक’ आणि ‘मंदिर’ या संकल्पनांमध्ये जो गोंधळ आहे, तो आपण टाळला पाहिजे. ‘स्मारक’ हे मृत व्यक्तींचे केले जाते; उदाहरणार्थ राजकीय पुढार्‍यांचे, शूरविरांचे, समाजसेवकांचे, महापुरुषांचे इत्यादी. मानव किंवा व्यक्ती या मृत पावतात. त्यांची स्मृती लोकांच्या स्मरणात रहावी, त्यापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी, इतिहास लोकांच्या लक्षात यावा आदी अनेक उद्देशांनी स्मारकाची उभारणी केली जाते.

व्यक्ती आणि देवता यांत भेद आहे. देवीदेवतांना कधी मरण असते का ? देवता हे एक तत्त्व असते. देवता या अविनाशी आहेत. म्हणून स्मारक हे व्यक्तींसाठी निर्माण करणे योग्य आहे. सर्वसामान्य माणसे परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव हे सारे शब्द एकाच अर्थाने, म्हणजे समानार्थी वापरतात; परंतु प्रत्यक्षात यात आध्यात्मिक स्तरावर भेद आहे. या प्रत्येक संज्ञेचा अर्थ वेगळा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवतांना वेगवेगळा कार्यभार सोपवला आहे. त्यांच्यात ‘८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती’, असे ५ स्तर आहेत. प्रजापती, तसेच ब्रह्मा, विष्णु, महेश हे त्रिदेव आणि मीनाक्षी (शक्ती, अंबा) या उच्चदेवता आहेत. निसर्गातील पंचतत्त्वांना, म्हणजे पंचमहाभूतांना पृथ्वी, आप, तेज (सूर्य), वायू आणि आकाश यांनाही मानवाने देवत्व प्रदान केलेले आहे, तसेच क्षेत्रपाल देव, ग्रामदेव, स्थानदेव, वास्तुदेव या देवताही आहेत. कुलदेवता, मूळ पुरुष, गुरु हे सर्व मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित देव आहेत. विष्णूचे दशावतार आहेत, तेही देवतास्वरूप आहेत. काळानुसार त्या त्या अवतारांचे महत्त्व असते. शक्ती आणि देवता या चिरायू असतात. प्रत्येक स्थानाची एक स्थानदेवता किंवा क्षेत्रपाल देवता असते. त्या स्थानाचे दायित्व त्या देवतेकडे असते. ग्रामदेवता त्या त्या गावाचे रक्षण करण्याचे दायित्व घेते. अशा देवतांचे अधिष्ठान त्या स्थानात किंवा गावात असणे आवश्यक असते. इतरत्र हालवून त्या गावचे कल्याण कसे काय साध्य होऊ शकते ? त्यामुळे अशा मंदिराची उभारणी त्याच गावाच्या परिसरात केले, तरच त्या गावकर्‍यांना त्याचा खरा लाभ घेता येईल. या संदर्भात धर्मगुरु किंवा संत यांचे उचित मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मानवाचे स्मारक आणि देवतेचे मंदिर त्या त्या स्थानी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चुकीचे शब्दप्रयोग टाळले पाहिजेत !

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.