PM MODI In GOA : गोवा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतीक !

मडगाव येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार !

गोव्यातील सभेत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत

मडगाव, ६ फेब्रुवारी (वार्ता.) : गोव्यात विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांचा लाभ गोमंतकियांना होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. काही राजकीय पक्ष खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवत असतात; मात्र गोव्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्वधर्मीय लोक एकोप्याने रहातात आणि हेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतीक आहे, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव येथील कदंब बसस्थानकावर ६ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘विकसित भारत, विकसित गोवा २०४७’ या सभेला संबोधित करतांना काढले.

या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यपाल श्रीधरन् पिल्लई आदींची उपस्थिती होती. सभेला ७० सहस्र लोकांची उपस्थिती होती, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले,

१. ‘‘गोवा आकाराने लहान आहे आणि येथे लोकसंख्याही अल्प आहे; मात्र सामाजिक विविधतेचा विचार केल्यास गोवा राज्य पुष्कळ मोठे आहे. गोव्याचा आणि येथील नागरिकांचा विकास हेच आमचे प्राधान्य आहे. गोवा राज्य सुंदर समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यांसाठी ओळखले जाते. देशी-विदेशी पर्यटकांचे गोवा हे सुट्टी घालवण्यासाठीचे प्रचलित ठिकाण आहे. ‘कॉन्फरन्स टुरिझम्’मुळे गोव्यात रोजगारनिर्मिती होणार आहे.

२. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांचा राज्यातील खेळाडूंना लाभ होणार आहे. गोव्याचे फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले आहे.

३. गोव्यातील अंतर्गत भागांत ‘इको टुरिझम्’ला चालना दिली जाणार आहे. केंद्र सरकार गोव्याला शिक्षणाचे प्रमुख ठिकाण म्हणूनही चालना देणार आहे.

४. गोव्यात नव्याने चालू झालेला मोपा विमानतळ, नवीन झुआरी पूल, नवीन शिक्षण संस्था राज्याच्या विकासात भर टाकणार आहे.

५. आम्हाला गोव्यात संपर्क यंत्रणा (कनेक्टिव्हिटी) वाढवून गोव्याला ‘लॉजिस्टिक हब’ बनवायचे आहे. गोव्याच्या विकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. ‘मोदींच्या गॅरंटी’मुळे (‘मोदी करू शकतील’, या विश्वासामुळे) राज्यातील प्रत्येकाचे आयुष्य सुधारेल, असा मला विश्वास आहे.’’

गोव्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांना चालना देणार !

जी- २०’ परिषद, ‘एस्.ई.ओ.’ आणि आता ऊर्जा सप्ताह अशा कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन झाल्याने गोव्याची ओळख जागतिक स्तरावर पोचली आहे. आगामी काळात गोव्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील कार्यक्रमांचे आयोजन करून गोव्याला ‘कॉन्फरन्स टुरिझम्’च्या माध्यमातून पुढे आणणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ सहस्र ३३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत, विकसित गोवा २०४७’ कार्यक्रमाच्या अंतर्गत १ सहस्र ३३० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. कुंकळ्ळी येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’, दोनापावला येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स’, बेती येथील ‘आय.एन्.एस्. मांडवी नेव्हल वॉर’ महाविद्यालयाचे नवीन संकुल आणि कुडचडे येथील कचरा प्रकल्प या ४ प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच रेईश मागुश येथील खासगी-सरकारी भागीदारी तत्त्वावर येऊ घातलेला ‘रोप वे’ प्रकल्प, पाटो-पणजी येथील ‘थ्री डी प्रिंटेड’ इमारत आणि शेळपे, साळावली येथे प्रतिदिन १० कोटी लिटर जलशुद्धीकरण प्रकल्प यांची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी ‘रिमोट कंट्रोल’द्वारे कळ दाबून ‘ऑनलाईन’ पद्धतीने केली.

सभेला उपस्थित जनसागर !

प्रसिद्ध कलाकार आणि संत यांच्यामुळे गोव्याची ओळख

गोमंतभूमीने अनेक संत, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्वे यांना जन्म दिला आहे. यामध्ये संत सोहिरोबानाथ आंबिये, आद्य नाटककार कृष्णभट बांदकर, सुरश्री केसरबाई केरकर, आचार्य धर्मानंद कोसंबी, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतरत्न लता मंगेशकर आदींचा समावेश आहे. गोव्यात ऐतिहासिक लोहिया मैदान (पोर्तुगिजांच्या विरोधातील क्रांतीची ज्योत पेटवलेले प्रथम ठिकाण) हा पुरावा आहे की, देशासाठी काही करायची वेळ येते, तेव्हा गोमंतकीय कोणतीही कसर सोडत नाहीत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा प्रारंभ कोकणी भाषेतून केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील भाजपच्या मागील १० वर्षांच्या विकासकामांचा आढावा दिला.