गुन्हेगारीमुक्त २५ गावे !

सामाजिक सलोखा टिकून रहावा, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन व्हावे, यांसाठी पोलीस प्रशासन २४ घंटे सतर्क असते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आज गावागावांत पोलीस ठाणी बांधण्यात आली आहेत; मात्र या देशात आज अशीही पोलीस ठाणी आहेत, ज्यांच्यात आजतागायत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. त्यावर कदाचित् कुणाचाही विश्वास बसणार नाही; मात्र हे सत्य आहे ! राजस्थानमधील बिकानेर परिसरातील अशी २५ गावे आहेत, ज्यांतील एकही माणूस आजतागायत पोलीस ठाण्याची पायरी चढलेला नाही. या २५ गावांतील लोकप्रतिनिधींचा परिक्षेत्र स्तरावर सत्कार करण्यात येणार आहे. या गावातील लोकप्रतिनिधी, पंच, सरपंच गावातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि समस्या निवारण करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात ? कोणती ध्येयधोरणे राबवतात ? पोलिसांपर्यंत येण्याची लोकांना आवश्यकता का भासत नाही ? याचा पोलीस प्रशासन सध्या अभ्यास करत आहे. या अभ्यासातून ग्राम पातळीवर एक ‘मॉडेल’ विकसित केले जाणार आहे. या ‘मॉडेल’ची अन्य गावांमध्येही कार्यवाही करून नागरिकांच्या समस्या गावपातळीवर सोडवून पोलिसांवरील भार न्यून करता येईल का ? यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

या २५ गावांमधील कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही, याचा अर्थ इथे गुन्हे घडत नाहीत किंवा नागरिकांच्या काही समस्याच नाहीत, असे नव्हे. या ठिकाणी कुणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा समस्या प्रथम पंचायतीमध्ये येते. येथील ग्रामप्रमुख, सरपंच आणि वडीलधारी मंडळी दोन्ही पक्षाची बाजू नीटपणे ऐकून घेतात, त्या समस्येवर सविस्तर चर्चा करतात आणि ती समस्या सामंजस्याने सोडवतात. कुणाची चूक असल्यास पंचायतीकडून गुन्हेगाराला शिक्षाही दिली जाते. वडीलधारी मंडळी आणि पंचांचा मान राखून गुन्हेगार शिक्षेचा स्वीकार करतो. त्यासाठी कुणीही दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात जात नाही. न्यायनिवाडा करणार्‍या येथील ज्येष्ठ मंडळींवर ग्रामस्थांचाही पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे वर्षोनुवर्षे ही परंपरा अबाधित आहे. बिकानेर पोलिसांनी गावातील या व्यवस्थेला ‘पर्यायी विवाद निराकरण’, असे नाव दिले आहे. या गावांची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे येथे मद्याची दुकाने नाहीत. त्यास पंचायत मंडळी अनुमती देत नाहीत, तसेच या गावात धूम्रपान करण्यासही मज्जाव आहे. या गावातील सामंजस्य टिकण्यामागे या गावांत व्यसनांना घालण्यात आलेली बंदी हेसुद्धा प्रमुख कारण आहे. आपली प्राचीन स्वयंपूर्ण खेड्यांची व्यवस्था कशी परिपूर्ण होती, हे या उदाहरणावरून थोडेसे लक्षात येईल. अशा प्रकारे देशातील सर्वच खेडी गुन्ह्यांच्या दृष्टीने स्वयंशासित झाली, तर देशाचा खरा विकास होईल !

–  श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.