काशीविश्वनाथप्रमाणे पंढरपूर येथील विकास आराखडा होणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पंढरपूर – पंढरपूरच्या विकासासाठी काशीविश्वनाथप्रमाणे मोठा विकास आराखडा बनवण्याचे काम चालू आहे. संवादातून बाधित नागरिक आणि दुकानदार यांचे प्रश्न सोडवले जातील. कोणतीही विकासकामे करतांना गावात नाराजी असता कामा नये. त्यामुळे सूक्ष्म, शास्त्रशुद्ध पद्धतीने समाधानकारक तोडगा काढला जाईल. त्यासाठी सहकार्य करा, कारण नसतांना वातावरण दूषित करू नका, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रभागा शुद्धीकरणासाठी ९९५ कोटी रुपयांच्या कामासाठी संमती !

‘नमामि चंद्रभागा’ केवळ कागदावर नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती चालू आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील जे अशुद्ध पाणी नदीत मिसळत होते, त्यासाठी ९९५ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. आता या कामास मान्यता मिळाली असून पुढे याची प्रत्यक्ष प्रक्रिया चालू होईल, असेही मुनगंटीवार यांनी या प्रसंगी सांगितले.

पंढरपूर मंदिर विकासासाठी नियोजन समितीतून ५ कोटी रुपये ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सोलापूर – पंढरपूर येथील ‘नामदेव पायरी’ येथे चढण्यासाठी करण्यात आलेल्या पायरीची उंची ६ इंच असून ती ५ इंच करावी, पंढरपूर येथील विकासकामे करण्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसर आणि अयोध्या येथील कामे पाहून घ्यावी, तसेच पंढरपूरच्या विकासकामासाठी नियोजन समितीमधून ५ कोटी रुपये देण्यात येतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पंढरपूरच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यासाठी कामे चालू असून त्याचा आराखडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.