नाशिक येथे भटक्या कुत्र्याकडून ४ लहान मुलांवर आक्रमण

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील जेलरोड परिसरात शेफर्ड जातीच्या कुत्र्याने ४ लहान मुलांचा चावा घेतल्याची घटना घडली. घायाळ मुलांवर बिटको रुग्णालयात उपचार चालू आहेत. महापालिकेच्या २ पथकांनी ३ फेब्रुवारी या दिवशी ३ घंटे शोध घेऊनही हा कुत्रा आढळला नाही. या कुत्र्याने आणखी काहींना चावा घेतला आहे का ? याची माहिती पालिकेचे कर्मचारी घेत आहेत. ‘कुत्रा आढळल्यास महापालिकेला कळवावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही मुले शिकवणीवर्गाहून घरी येत होती. स्थानिक रहिवासी धावून आल्याने या मुलांचे प्राण वाचले. हा कुत्रा पाळीव असण्याचा संशय आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी संबंधित मुलांच्या पालकांनी केली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यावर संबंधित कुत्र्यासह भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक शरद मोरे यांनी केली आहे.

मांसाहारी खाद्यविक्रेत्यांमुळे कुत्रे हिंस्र होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर अंडा-भुर्जी यासह अन्य मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपर्‍या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढली आहे. हे कुत्रे रस्त्यांवरील नागरिकांवर आक्रमण करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवली जात नसेल, तर देशाने महासत्ता होण्याची स्वप्ने कशी पहावीत ?