भाजप आध्यात्मिक आघाडीद्वारे १५ फेब्रुवारीपासून राज्यभरात संत-महंतांचे मेळावे ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी

आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी

नागपूर – ‘मिशन २०२४’च्या महाविजयासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात हिंदु समाजातील विविध संत-महंतांचे मेळावे राज्यात घेण्यात येणार आहेत. याचा प्रारंभ येत्या १५ फेब्रुवारी या दिवशी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यापासून होत आहे, अशी माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ३१ जानेवारी या दिवशी येथे दिली. ‘येत्या १५ फेब्रुवारीपासून सर्व लोकसभा समन्वयक त्या त्या लोकसभेतील धर्माचार्य, तसेच प्रमुखांना घेऊन एक मेळावा घेतील’, असेही त्यांनी सांगितले.

४८ लोकसभांत ४८ संयोजकांची नियुक्ती !

या मेळाव्यांसाठी ४८ लोकसभांचे ४८ संयोजक नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, तसेच वारकरी संप्रदाय, रामदासी, स्वामी समर्थ परिवार, तुकडोजी महाराज परिवार, गायत्री परिवार, श्री सेवक परिवारासह कीर्तनकार, प्रवचनकार, साधू-संत, महंताशी समन्वय आणि संपर्क ठेवण्यात आला आहे.

आतापर्यंत ४०६ प्रमुख धर्माचार्य आणि संत यांच्याशी संपर्क !

आतापर्यत ४०६ प्रमुख धर्माचार्य, तसेच संत-महंतांशी संपर्क आणि चर्चा झाली आहे. पंडित प्रदीप मिश्रा, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, संजय महाराज पाचपोर, योगगुरु रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर आदींसह अनुमाने ३ सहस्र कीर्तनकारांपर्यत भाजपची आध्यात्मिक आघाडी पोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निश्चयाने सारे प्रेरित होऊन काम करत आहेत.