पुणे येथील अलका चौकातील विज्ञापन फलक काढणार !

पुणे – येथील अलका चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीमागील नियमबाह्य उभारण्यात आलेल्या विज्ञापन फलकावरील (होर्डिंग) कारवाईस स्थगिती देण्याची याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे संबंधित विज्ञापन फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

१. विज्ञापन फलक उभारतांना दोन फलकातील प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, झाडांची तोडणी करणे, राडारोडा तेथेच टाकून जाणे आदी प्रकारांनी नियमांचे उल्लंघन केले होते.

२. ती जागा महापालिकेची असतांनाही अनुमती घेतली नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये या फलकांवर महापालिकेने बंदी घातली होती.

३. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी हा विज्ञापन फलक काढून टाकण्याचा आदेश दिला होता. त्यानंतरही महापालिकेच्या अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. (वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांवर कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करणे आवश्यक आहे ! – संपादक)

४. सदरचे विज्ञापन फलक उभारण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील ३ कर्मचार्‍यांचे निलंबनही करण्यात आले होते.