Ram Mandir Darshan : श्रीराममंदिरात दर्शनासाठी दुसर्‍या दिवशीही भाविकांची रीघ !

श्री रामललच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी

अयोध्या,२४ जानेवारी (वार्ता.) – श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्याच्या दर्शनासाठी दुसर्‍या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी होती. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी, म्हणजे २३ जानेवारी या दिवशी सकाळपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतर एकाच दिवशी ५ लाख भाविकांनी श्री रामललाचे दर्शन घेतले. या वेळी मंदिरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः मंदिराच्या ठिकाणी आले आणि त्यांनी दर्शन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या. यानंतर २४ जानेवारीला सकाळपासून शिस्तबद्ध आणि नियंत्रित पद्धतीने दर्शन व्यवस्था चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
वाहनांची गर्दी टाळण्यासाठी सकाळपासून अयोध्येत काही अपवाद वगळता सर्व वाहनांना, विशेषतः चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर लक्ष्मणपुरी येथून अयोध्येला येणार्‍या सर्व सरकारी बसगाड्या लक्ष्मणपुरी येथे  थांबवण्यात आल्या होत्या.

सरकारकडून दर्शनाच्या वेळेत दुसर्‍याच दिवशी पालट

गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने मंदिराच्या वेळेत दुसर्‍याच दिवशी पालट केला असून आता मंदिर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी उघडे असणार आहे. सरकारने महनीय व्यक्तींना पुढील १० दिवस दर्शनासाठी अयोध्येला न येण्याचे आवाहन केले आहे.