पोथी वाचन कसे करावे ?

१. ‘पोथी वाचतांना तोंड पूर्व, उत्तर आणि पश्चिम या दिशेकडे करावे. आपल्यासमोर देवप्रतिमा असल्यास दक्षिणेकडे तोंड असले तरी चालते; कारण आपले तोंड देवाकडे असते.

२. एक अध्याय संपला, म्हणजे पुढील अध्ययनाच्या किमान ५ ओव्या वाचाव्या. पुढे वाचणे झाल्यास त्यापुढे १०-१० अशा, म्हणजे १५-२५- ३५ याप्रमाणे ओव्या वाचाव्यात. ज्यांचा प्रतिदिन काही ओव्या वाचण्याचा पाठ आहे. त्यानेही याप्रमाणे वाचावे.

३. वाचतांना सुस्पष्ट वाचावे. घरातील सर्वांना ऐकू येईल, असे मोठ्याने वाचावे.

४. पान संपल्यावर उलटायचे पान आपल्या बाजूस घेऊन उलटावे. पोथीची बांधणी पुस्तकाप्रमाणे नसते. तिची पाने आपल्याकडून पुढच्या बाजूकडे उलटतात. वाचून झालेली पाने आपल्याजवळ आणि वाचावयाची पाने पलीकडे, असे असावे. पोथी उलटतांना वाचलेला भाग आपल्याकडे येईल. वाचावयाचा भाग स्वामींकडे (गुरूंच्या वा देवतांच्या प्रतिमेकडे) असेल. याचा अर्थ ‘स्वामी आपल्याला सरस्वती गंगाधराप्रमाणे सांगत आहेत आणि आपण वाचत आहोत,’ असे होते. हे शक्यतो पाळावे.

५. पाठ संपल्यावर ‘गुरुपासष्टी’ (गुरुचरित्राच्या अध्यायामधील निवडक ओव्या) म्हणावी.

६. यानंतर नेवैद्य आणि आरती करावी. आरतीनंतर प्रसाद वाटावा. प्रसादामध्ये गुळात शिजवलेले भुईमुगाचे भाजलेले दाणे असावेत. (या प्रसादाचा अर्थ – भुईमुगाचे भाजलेले दाणे, म्हणजे भाजल्यामुळे त्रिविध तापाने पोळलेला जीव. ते दाणे गुळात शिजवणे, म्हणजे त्या पोळलेल्या जिवाला ब्रह्मानंदात (गुळाने शिजवल्यामुळे) लिन करावे. यासाठी हा प्रसाद.)’

– श्री. भा.र. रायरीकर

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१)