ASER Report : १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के युवकांना मातृभाषेतील इयत्ता दुसरीचा धडा वाचता येत नाही ! – सर्वेक्षण

पुणे – ‘ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट’ अर्थात् ‘असर’च्या ‘बियॉन्ड बेसिक्स’ नावाच्या वर्ष २०२३ च्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ग्रामीण भागांत इयत्ता दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचे समोर आहे. गांभीर्याची गोष्ट म्हणजे १४ ते १८ वयोगटातील सुमारे २५ टक्के युवकांना त्यांच्याच भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा वाचता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘हा प्रवेश आवड म्हणून घेतला आहे कि अपरिहार्यता ?’, हा मोठा चर्चेचा विषय आहे.

१. या अहवालात ग्रामीण भागांमधील १४ ते १८ वर्षांच्या युवकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील ५५.७ टक्के विद्यार्थी कला किंवा मानवशास्त्र शाखेत, त्यानंतर ३१.७ टक्के विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञान आणि ९.४ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले आहेत.

२. वय वर्ष १४ ते १८ वयोगटातील अर्ध्यापेक्षा अधिक युवक ३ ते १ अंकापर्यंतच्या आकडेमोडीच्या प्रश्‍नांची उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ ४३ टक्के युवकांनी बरोबर उत्तरे दिली. इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील प्रश्‍नांवर या युवकांशी संवाद साधण्यात आला.

. अर्ध्यापेक्षा अधिक युवकांनी (५७.३ टक्के) इंग्रजी भाषेतील वाक्य वाचली; परंतु, त्यांतील केवळ तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला. मुलांच्या तुलनेत मुली मातृभाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत असल्याचे दिसून आले; मात्र गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असल्याचे दिसून आले.

संपादकीय भूमिका

भारतातील शिक्षणाची ही स्थिती शिक्षण खात्यासाठी लज्जास्पद !