१७.१.२०२४ (पौष शुद्ध सप्तमी) या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात साधना करणारे चि. मेहुल राऊत आणि चि.सौ.कां. कोमल पाटील यांचा शुभविवाह आहे. चि. मेहुल आश्रमात ध्वनीचित्रीकरणाची (‘व्हिडिओ शूटिंग’ची) सेवा करतात, तर चि.सौ.कां. कोमल ‘अर्काइवल’ची सेवा करतात. (अर्काइवल : ध्वनीचित्रीकरण केलेल्या विविध प्रकल्पांचा साठा विशिष्ट पद्धतीने जतन करणे) त्यांच्या विवाहानिमित्त कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. मेहुल राऊत यांची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. मनोहर राऊत (चि. मेहुल यांचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. साधी रहाणी आणि समाधानी वृत्ती : ‘मेहुलची रहाणी अत्यंत साधी आहे. त्याला कपडे आणि खाण्या-पिण्याची आसक्ती नाही. जे मिळेल, त्यात तो समाधानी असतो. कुटुंबीय किंवा साधक यांच्याकडून त्याला कुठलीही अपेक्षा नसते.
१ आ. नम्रता आणि प्रेमभाव : साधना करू लागल्यावर मेहुलमध्ये पुष्कळ चांगले पालट झाले. तो सर्वांशी प्रेमाने बोलतो. तो त्याचे मत नम्रपणे सांगून उपाय सुचवतो. मी त्याला घरातील एखादे काम सांगितल्यावर तो नम्रपणे ते काम पूर्ण करतो.
१ इ. समाजातील लोकांशी जवळीक साधण्याची हातोटी : आश्रमात सेवेला येण्यापूर्वी मेहुल वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन अध्यात्मप्रसाराची सेवा करायचा. तो मन लावून आणि परिपूर्णतेने ही सेवा करायचा. त्याने समाजातील लोकांशी जवळीक साधून प्रसार केला, सत्संग घेतले आणि लोकांना सनातन संस्थेशी जोडले.
१ ई. कुटुंबियांना साधनेसाठी साहाय्य करणे : मेहुल घरातील अडचणींच्या वेळी धावून येतो आणि आम्हाला साहाय्य करतो. घरातील कठीण प्रसंगांमध्ये न अडकता तो नेहमी तटस्थ भूमिका घेतो. वर्ष २०२० मध्ये आमच्या कुटुंबात एक गंभीर प्रसंग घडला होता. या कौटुंबिक संकटामुळे आम्ही पुष्कळ काळजीत होतो. तेव्हा मेहुल आम्हाला म्हणाला, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आपल्या पाठीशी असतांना ताण कशाला घेता ? ते आपल्याला या संकटातून बाहेर काढणार आहेत. आपण केवळ त्यांनी सांगितलेली साधना करायची आहे.’’ मेहुलने धीर दिल्यामुळे आमचा ताण न्यून झाला आणि प.पू. गुरुदेवांनी मोठ्या संकटातून बाहेर काढल्याची आम्ही अनुभूती घेतली.
१ उ. भाव : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती त्याचा भाव आहे.
१ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील श्रद्धेने चित्रीकरणाची सेवा करणे : मेहुलला आरंभी चित्रीकरण सेवेविषयी काहीच ठाऊक नव्हते; परंतु ‘ही सेवा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दिली आहे आणि तेच सेवा करवून घेणार आहेत’, अशी त्याची अतूट श्रद्धा होती. त्यामुळे त्याने सेवेतील सर्व बारकावे शिकून घेतले. आता तो दायित्व घेऊन सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण रीतीने करण्याचा प्रयत्न करतो.
हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारा मेहुल हा गुणी मुलगा तुम्हीच आम्हाला दिलात. त्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
२. श्री. स्नेहल राऊत (चि. मेहुल यांचा लहान भाऊ) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा.
२ अ. मुंबईतील मायानगरीत रममाण झालेल्या मेहुलदादाने वडिलांनी वारंवार सांगूनही साधना न करणे आणि काही काळाने ‘मला मायेतील जीवनाचा कंटाळा आला आहे’, असे सांगून साधना करू लागणे : ‘पूर्वी मेहुलदादा मुंबईतील विमानतळावर काम करत असे. तो मित्रांच्या संगतीने मुंबईच्या मायेतील जीवनात रममाण झाला होता. बर्याच वेळा वडील (श्री. मनोहर राऊत) त्याला आश्रमात सेवेसाठी जाण्यास सांगायचे; पण त्याने कधी लक्ष दिले नाही. वडिलांना त्याची पुष्कळ चिंता वाटायची. तेव्हा ‘वेळ आली की, मी साधना करीन’, असे तो वडिलांना सांगायचा. शेवटी त्यांनी ‘दादा साधना करेल’, ही अपेक्षा करणे सोडून दिले. काही दिवसांनी दादाचा वडिलांना भ्रमणभाष आला. तो म्हणाला, ‘‘मला या मायेतील जीवनाचा कंटाळा आला आहे. मला साधना करावी वाटत आहे.’’ नंतर तो देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी जाऊ लागला.
२ आ. नम्रता आणि प्रेमभाव : मी मेहुलदादांच्या अगोदर पूर्णवेळ साधना करू लागलो; पण माझ्यात साधनेचे गांभीर्य नव्हते. मी साधकांशी नम्रपणे न बोलता विनोद करून आणि उद्धटपणे वागत असे. एकदा मला मेहुलदादा समवेत प्रसारासाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा तो सर्वांशी नम्रपणे आणि प्रेमाने बोलत होता. त्याच्याकडून मला हे शिकायला मिळाले. साधना करायला आरंभ केल्यावर त्याच्यामध्ये पुष्कळ चांगले पालट झाले. नंतर मीही त्याच्याप्रमाणे स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करू लागलो.
२ इ. सेवेची तळमळ
२ इ १. पुढाकार घेऊन सेवा करणे : मेहुलदादाला आरंभी ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेचा अनुभव नव्हता. त्याने प्रत्येक सेवेत पुढाकार घेऊन सेवा केल्यामुळे आता त्याला प्रत्येक सेवा सहजतेने करता येते.
२ इ २. सेवेचे परिपूर्ण नियोजन करणे : चित्रीकरणाची सेवा करतांना मेहुलदादा सर्व सेवांचे नियोजन करून सर्वांना सेवा वाटून देतो आणि नंतर त्या सेवेचा आढावा घेतो. सेवेत काही अडचण येत असेल, तर तो स्वतः साहाय्य करतो.
२ ई. सेवेतील चुकांमुळे निराशा आली असतांना मेहुलदादाशी बोलल्यावर मन सकारात्मक होऊन साधनेसाठी प्रोत्साहन मिळणे : मी ध्वनीचित्रीकरणाची सेवा करतांना माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्याकडून चुका होत. संबंधित साधकांनी मला त्या चुकांची जाणीव करून दिल्यावर मला वाटायचे, ‘मला ही सेवा करायला जमणार नाही. आता मी दुसरी सेवा करीन.’ काही वेळा मेहुलदादा सेवेत झालेल्या चुकांमुळे निराश झालेला असायचा; पण अशा स्थितीतही तो मला म्हणायचा, ‘‘मी ही सेवा सोडून कधीच दूर जाणार नाही. कितीही संकटे आली, तरी मी संकटांशी लढणार. तू कशाला घाबरून पळ काढतोस ? आपल्या पाठीशी देव अाहे ना. आपण पुन्हा प्रयत्न करू आणि उभे राहू !’’ त्याच्या या सकारात्मक बोलण्यामुळे माझ्यातील नकारात्मक विचार दूर जाऊन मला साधनेसाठी प्रोत्साहन मिळायचे.
मेहुलदादा आणि मी नात्याने भाऊ असलो, तरी आम्ही नेहमी जिवलग मित्रांसारखे वागतो. आम्ही एकमेकांना मित्राप्रमाणे साहाय्य करतो. देवाने मला मेहुलदादासारखा भाऊ दिला, यासाठी मी गुरूंच्या चरणी कृतज्ञ आहे.’
साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. संतांना अपेक्षित अशी सेवा व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : ‘आश्रमात एखादा कार्यक्रम असल्यास श्री. मेहुल चित्रीकरणाचे नियोजन करतो. त्या वेळी ‘केवळ चित्रीकरण चांगले व्हावे’, असा विचार न करता संपूर्ण कार्यक्रमात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि संतांना अपेक्षित अशी सेवा व्हावी, अशी त्याला तळमळ असते. त्यामुळे नियोजन करतांना ‘कार्यक्रमात आणखी काय चांगले करता येईल ?’, या विचारांत राहून तो सेवेशी पूर्ण एकरूप होऊन जातो.
१ आ. तहान-भूक विसरून सेवा करणे : कार्यक्रम असतांना बर्याच वेळा चित्रीकरणाची सिद्धता चालू असते किंवा चित्रीकरण बराच वेळ चालू रहाणार असते. अशा वेळी महाप्रसादाची वेळ झाल्यावर तो स्वतः महाप्रसाद घेण्यासाठी न जाता सेवाच करत रहातो. सहसाधकांना मात्र तो महाप्रसाद घेण्यासाठी पाठवतो. ‘कोणताही साधक उपाशी राहू नये’, असा त्याचा प्रयत्न असतो.’
२. श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. सहसाधकांना सेवा शिकवून स्वावलंबी करणे : ‘वर्ष २०१४ मध्ये मला चित्रीकरणाशी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. आरंभी मला या सेवेविषयी काहीही ठाऊक नव्हते. मेहुलदादांनी ही सेवा ‘सहजतेने आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ?’, ते मला शिकवले. त्यामुळे मला सेवेची भीती वाटली नाही. दादांनी अन्य साधकांनाही ‘दायित्व घेऊन सेवा कशी करावी ?’ याविषयी शिकवले आहे.
२ आ. मेहुलदादांशी बोलल्यावर मन सकारात्मक होणे : मेहुलदादा नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. मी त्यांना घरातील किंवा सेवेतील अडचणी मनमोकळेपणाने सांगतो. ते मला चांगले दृष्टीकोन देतात. त्यामुळे माझे मन सकारात्मक होते.
२ इ. तत्त्वनिष्ठता : सेवा करतांना माझे काही चुकत असेल, तर दादा तत्परतेने माझी चूक सांगतात. अशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी ते दृष्टीकोनही देतात. त्यामुळे सेवा करतांना मला ताण येत नाही.
२ ई. प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा ध्यास : प.पू. गुरुदेव चित्रीकरणामध्ये सुधारणा आणि चुका सांगतात. तशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी दादा सतत प्रयत्न करतात. प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा त्यांना दिवसरात्र ध्यास असतो.’
३. श्री. केदार नाईक, फोंडा, गोवा.
३ अ. नियोजन कुशलता : ‘एका सेवेची घडी पुष्कळ विस्कळीत झाली होती. मेहुलदादांनी त्या सेवेतील बारकावे काढून अभ्यास केला. त्यांनी सेवेत सहभागी असणार्या साधकांचा एक सत्संग घेतला आणि सेवेचे नियोजन केले. त्यामुळे अनुमाने ६ वर्षे प्रलंबित असणारी सेवा मागील २ वर्षांत ८० टक्के पूर्ण झाली.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘चुकांविरहित सेवा करणे अपेक्षित आहे’, याची मेहुलदादांनी सहसाधकांना जाणीव करून देणे : काही मासांपूर्वी संशोधनाच्या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे काढायची होती; परंतु मी आणि सहसाधक श्री. अतुल बधाले यांनी त्याचे कोणतेच नियोजन केले नव्हते. या चुकीची गुरुदेवांनी आम्हाला जाणीव करून दिली. नंतर आम्ही ती सेवा पूर्ण केली. तेव्हा गुरुदेवांनी आम्हाला खाऊ दिला. तेव्हा मेहुलदादा आम्हाला म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी खाऊ दिला, हे चांगले झाले; परंतु त्याआधी त्यांनी चुकांची जाणीवही करून दिली आहे. चुकांची जाणीव करून दिल्यानंतर सेवा करणे आणि खाऊ मिळवणे, यांपेक्षा ‘चुकांविरहित सेवा करणे’ हे देवाला अधिक अपेक्षित आहे. तुम्ही आरंभीच चांगले नियोजन केले असते, तर ते गुरुदेवांना अधिक आवडले असते.’’
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली आणि आरंभी कठीण वाटणारी सेवा श्रद्धा ठेवून पूर्ण करणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांचा सत्संग घेत होत्या. सत्संगातील एका तांत्रिक सूत्राचा पूर्वानुभव नसल्याने एक सेवा करणे आम्हाला थोडे कठीण वाटत होते. त्यामुळे मेहुलदादा ती अडचण सांगत होते. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘मेहुल, तू ‘हो’तरी म्हण, देव सेवा करवून घेईल !’’ त्यानंतर मेहुलदादा आम्हाला म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या आहेत, तर देवच सर्व करवून घेईल. आपण हा विश्वास न्यून होऊ द्यायचा नाही. आपण प्रयत्न करू.’’ त्यानंतर जे तांत्रिक सूत्र आम्हाला कठीण वाटत होते, ते करणेही सहज शक्य झाले.’
४. श्री. राजू सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. चुकांप्रती संवेदनशीलता : एकदा मेहुलदादांकडून गंभीर चुका झाल्या होत्या. त्यांची जाणीव झाल्यावर दादांना पुष्कळ खंत वाटली. ‘चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी ते शरणागत स्थितीत आणि अपराधी भावाने मनातून प.पू. गुरुदेवांशी बोलत होते. नंतर दुसर्या दिवशी प.पू. गुरुदेवांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर ते दादांना म्हणाले, ‘‘तू इतका आनंदी कसा आहेस ? कोणते प्रयत्न केलेस ?’’ त्यांचे बोलणे ऐकून दादांना पुष्कळ गहिवरून आले आणि त्यांची भावजागृती झाली.
५. श्री. अनिमिष नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘मेहुलचा स्वभाव मनमिळाऊ आहे. आश्रमातील अनेक जणांशी त्याची जवळीक आहे. तो प्रत्येकाशी विनम्रेतेने आणि आदरपूर्वक बोलतो. त्यामुळे अनेक साधक त्याच्याशी जोडले जातात.
आ. त्याची निर्णयक्षमता चांगली आहे. तो अडचणी सोडवण्यासाठी लगेच निर्णय घेतो. त्यामुळे सहसाधकांना ताण येत नाही.’
६. श्री. विनयकुमार आणि श्री. चेतन एम्.एन्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ अ. नियोजनकौशल्य : ‘दादा चित्रीकरण सेवेचे नियोजन करतांना उपलब्ध साधकांच्या संख्येनुसार ‘किती साधक लागतील आणि सेवा पूर्ण होण्यास किती वेळ लागेल’, असा अभ्यास करतो. त्यामुळे सेवेचे परिपूर्ण नियोजन होण्यास साहाय्य होते.’
चि.सौ.कां. कोमल पाटील यांची सहसाधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये
१. श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. परिपूर्ण सेवा करणे : ‘कोमलताईमध्ये ‘नियोजनकौशल्य आणि सेवांचा समन्वय करणे’, हे गुण आहेत. मी तिला समन्वय करण्यास सांगतो. तेव्हा ती परिपूर्ण सेवा करेल, याची मला निश्चिती असते. कोमलताई सर्व सेवा व्यवस्थित करू शकते.
१ आ. साधकांना साहाय्य करणे : आश्रमात कोणीही साहाय्य मागितले, तरी कोमलताई ‘नाही’ म्हणत नाही. रुग्णाईत असतांनाही ती साहाय्य करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आमच्या सेवांसाठी किंवा पूर्ण आश्रमात कोणाला साहाय्याची आवश्यकता वाटली, तर पहिल्यांदा त्यांना कोमलताईचीच आठवण येते.
१ इ. साधकांना आधार देणे : साधकांना सेवा किंवा काही प्रसंग यांमुळे ताण आला, तर ते कोमलताईशी मनमोकळेपणाने बोलतात. ताई साधकांना प्रेमाने आणि सहजतेने सोपे दृष्टीकोन सांगते. त्यामुळे साधकांचा ताण दूर होतो.
१ ई. शारीरिक त्रास असतांनाही आनंदी असणे : कोमलताईला काही वेळा शारीरिक त्रास होतो, तरीही ती आनंदी असते. ‘गुरुदेव शारीरिक त्रासांतून स्वतःचे प्रारब्ध न्यून करत आहेत’, असा तिचा भाव असतो.
कोमलताईमध्ये असलेले गुण सेवेतील सर्व साधकांमध्ये येऊ देत, ही गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’
२. श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. ‘प्रत्येक सेवा माझी आहे’, या भावाने सेवा करणे : ‘मध्यंतरी चित्रीकरणाच्या काही सेवांमध्ये सुसूत्रता नव्हती. तेव्हा सर्व सेवा व्यवस्थित व्हाव्यात; म्हणून कोमलने अनेक सेवा शिकून घेतल्या. ‘प्रत्येक सेवा माझी आहे’, असा तिचा भाव असायचा. सेवेसाठी साधकसंख्या अल्प असल्यास कोमल अधिकाधिक वेळ सेवेसाठी द्यायची. सेवेची फलनिष्पत्ती वाढावी, यासाठी ती सतत प्रयत्न करते.
२ आ. चुका स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी साधकांनी सेवेतील चुका सांगितल्यास त्या स्वीकारतांना कोमलच्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. यासाठी तिने उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेतले. आता तिला तिच्या चुका स्वीकारता येतात.’
३. कु. प्रेरिता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. आधार देणे : ‘मागील ३ वर्षांपासून मी आणि कोमलताई सेवेनिमित एकत्र आहोत. आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. मला कोणत्याही प्रसंगाचा ताण आला किंवा मला माझे मन मोकळे करायचे असेल, तर तेव्हा मला कोमलताई हक्काची वाटते. तिने माझी मोठ्या बहिणीसारखी काळजी घेतली आहे.
३ आ. शिकण्याची वृत्ती : सेवा करतांना अनेकदा संगणकीय अडचणींमुळे साधकांचा वेळ वाया जातो. त्या वेळी संगणकांची दुरुस्ती करणार्या साधकांकडून कोमलताई ‘संगणकीय अडचण कशी सोडवायची ?’ हे शिकून घेते आणि पुन्हा तशी अडचण आल्यास स्वतःच ती सोडवण्याचा प्रयत्न करते.
३ इ. प्रेमभाव : कधी कधी कोमलताई गडहिंग्लज, कोल्हापूर येथे तिच्या घरी जाते. घरून आश्रमात परत येतांना ती आमच्या आवडीचा खाऊ घेऊन येते. ती माझ्या आवडीची वस्तूही आणते.
३ ई. सेवेची तळमळ : सेवेची व्यस्तता असूनही कोमलताई आश्रमातील अन्य साधकांना साहाय्य करते. घरी असतांनाही ती सेवा करण्याचा प्रयत्न करते.
३ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर किंवा अन्य संत यांच्या आठवणी सांगतांना तिचा भाव दाटून येतो. ‘भगवंताने आतापर्यंत पुष्कळ केले आहे’, असा तिचा कृतज्ञताभाव असतो. अन्य कोणी साधक अनुभूती सांगत असतांनाही तिची भावजागृती होते.’
३ ऊ. संत आणि उत्तरदायी साधक यांच्याप्रती भाव : आश्रमातील संत, तसेच उत्तरदायी साधक यांच्याप्रती कोमलच्या मनात पुष्कळ भाव आणि आदर आहे. ‘ते आपले मार्गदर्शक आहेत आणि गुरूंचेच रूप आहेत’, असा तिचा भाव असतो.
४. सौ. मैथिली फडके, शिरोडा, गोवा.
४ अ. नेतृत्वगुण : ‘पहिल्यापासूनच मला कोमलताईमधील नेतृत्वगुण जाणवत होते. ती ‘अर्काइवल’च्या सेवेचे दायित्व लीलया पार पाडते. सहसाधकांना सेवा देतांना ती उत्तम समन्वय साधते आणि सर्वांकडून परिपूर्ण सेवा करून घेण्याचा प्रयत्न करते.
४ आ. उत्तम स्मरणशक्ती : कोमलताईची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. सेवेसंदर्भातील सर्व सूत्रे ती आपल्या वहीत लिहून ठेवते. ‘सेवेतील एखाद्या सूत्राचा निर्णय काय घेतला होता’, हे तिच्या व्यवस्थित लक्षात असते.
४ इ. प्रेमभाव : आश्रमातील लहानांपासून ते वृद्ध साधकांपर्यंत, सर्वांशी कोमलताईची जवळीक आहे. ती सर्वांशी हसतमुखाने बोलते आणि विचारपूस करते.’
५. श्री. सुरेश श्रीनिवास नाईक, फोंडा, गोवा.
५ अ. आधार देणे : ‘कु. कोमल माझ्या सेवेतील अडचणी सोडवते. त्याचप्रमाणे पुढे तशा प्रकारची अडचण आल्यावर ‘ती कशी सोडवायची’, हे मला समजावून सांगते.
५ आ. इतरांचा विचार करणे : ती माझ्या वयाचा विचार करून माझ्या क्षमतेनुसार मला अन्य सेवा देते. त्यामुळे मला सेवेचा ताण न येता आनंद मिळतो.
५ इ. कधी कोमलला काही शारीरिक त्रास होत असला, तरी त्याचा अधिक विचार न करता ती सेवेला प्राधान्य देते.’
६. कु. गायत्री बागल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘कु. कोमलताई लहान मुलांना छान सांभाळते. ती लहान मुलांच्या प्रश्नांना त्यांना समजेल, अशा प्रकारे उत्तरे देते. त्यामुळे लहान मुलांना ती जवळची वाटते.’
आ. कोमल साधकांची अडचण पूर्ण ऐकून घेऊन त्यावर लगेच उपाययोजना सांगते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.१२.२०२३)