ख्यातनाम चित्रकार बी.जी. शर्मा यांनी २२ जानेवारीपर्यंत उपलब्ध करून दिली चित्रे !
नागपूर – येत्या २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विहिंपच्या मंदिर तथा अर्चक-पुरोहित संपर्क आयामाला ख्यातनाम चित्रकार बी.जी. शर्मा यांनी त्यांची ‘वाल्मीकि रामायणा’तील प्रसंगांवर चितारलेली चित्रे उपलब्ध करून दिली आहेत. राज्यातील सर्व मंदिरांनी २२ जानेवारी या दिवशी या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करावे, असे आवाहन मंदिर तथा अर्चक-पुरोहित संपर्क आयामाचे अनिल सांबरे यांनी केले आहे.
सर्व भाविक आणि नवीन पिढी यांच्यापर्यंत रामायण पोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंदिर समिती सदस्य आणि भाविक यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. बी.जी. शर्मा यांनी रंगवलेल्या रामकथेवरील या फलकांचे प्रदर्शन मराठी, हिंदी आणि इंग्रजी माहितीसह आयामाने सिद्ध केले आहे. जागेनुसार प्रदर्शन लावल्यास अनुक्रमांकानुसार लावता यावी; म्हणून या सर्व चित्रांना प्रसंगानुसार अनुक्रमांक देण्यात आले आहेत. आयामाच्या संकेतस्थळावरून ‘डाऊनलोड’ करून प्रदर्शन लावायचे आहे. ३ फूट उभी आणि २ फूट रूंद आकाराची ही अनुमाने २५-२६ चित्रे आहेत.
हे फलक केवळ फ्लेक्सवर छापण्यासाठी आणि २२ जानेवारी या दिवशी रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंत सर्व मंदिरांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी सिध्द केले गेले आहेत. मंदिरांनी ‘राम जीवन चित्र प्रदर्शन’आयोजित करावे आणि शाळेतील मुले, तसेच कुटुंब यांना पहाण्यासाठी आमंत्रित करावे, असे आवाहन आयामाने केले आहे. पोस्टरवर संबंधित संस्थांचे लोगो आहेत. वाढदिवसानिमित्त मंदिरात निःशुल्क हवन आयोजित करणार्या आणि ‘राममंत्र बँक ॲप’ सिद्ध करणार्या समूहाद्वारे ही प्रदर्शनी सिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आयोजक https://rammantrabank.com/ या साईटवरून हे प्रदर्शन डाऊनलोड करू शकतात.