जव्हार (जिल्हा ठाणे) – कोरेगाव तालुक्यात एकंबे गावात ऊसतोडणीसाठी जव्हार येथील मजूर म्हणून गेलेल्या कातकरी लोकांना प्रतिदिन खोलीत डांबून मारहाण करण्यात येत होती. या मजुरांनी भ्रमणभाषवर व्हिडिओ काढून श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठवला. त्यानंतर त्यांनी या मजुरांची सुटका केली. काही मजुरांनी तेथून पूर्वीच पळ काढला होता.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित या मजुरांना नुकतेच भेटले. या वेळी कृष्णा नडगे या मजुराला २ मालकांनी ५ दिवस साखर कारखान्यातील एका खोलीत कोंडून अमानुष मारहाण केली होती. हे सांगतांना कृष्णा आणि त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. १२ वेठबिगार मजूर आणि त्यांची १४ मुले यांची श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मुक्तता केली. ज्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण सुटले आहे, त्यांना तात्काळ जवळच्या आश्रमशाळेत भरती करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांना पंडित यांनी या वेळी दिल्या. या सर्व पीडित वेठबिगारी मजुरांच्या स्थलांतरकाळात त्यांचे रेशनचे धान्य उचलल्याचे पंडित यांनी प्रशासनाला निदर्शनास आणून दिले; मात्र त्यांना पुरवठा विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.