श्रीराममंदिरामुळे समाजात एकजूट निर्माण होऊ दे !

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर यांचे विधान !

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर

मुडीपू (कर्नाटक) – ‘अयोध्येत २२ जानेवारीला साजरा होणारा श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आमच्या समाजात आणि देशात एकजूट निर्माण करणारा अन् देशाला कीर्ती प्राप्त करून देणारा सोहळा होऊ दे,’ असे काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकच्या  विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास सहभागी होणार का ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात खादर म्हणाले की, वेळ मिळाला, तर कुणीही जाईल. उद्घाटन सोहळ्याला जाण्यात चुकीचे काहीच नाही. (काँग्रेस पक्षाने मात्र श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला जाण्यास नकार दिला आहे. यातून काँग्रेस श्रीराममंदिराच्या प्रकरणी भरकटलेलीच दिसून येत आहे ! – संपादक)

खादर पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात सौहार्द, बंधुभाव, प्रीती आणि विश्‍वास निर्माण करण्याची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मी आनंदाने शुभेच्छा देतो.

संपादकीय भूमिका

  • श्रीराममंदिरामुळे हिंदूंमध्ये एकजूट निर्माण होत आहे आणि ते आता जागृत होत आहेत. ‘मुसलमान उघडपणे पुढे येऊन मंदिराविषयी सकारात्मक भूमिका का घेत नाहीत ?’, हे खादर यांनी सांगायला हवे !