श्रीराममंदिरातील पहिल्या सुवर्ण दरवाजाचे छायाचित्र प्रसारित !

४२ दरवाजांना १०० किलो सोन्याने लेपन करणार !

श्रीराममंदिरातील सुवर्ण दरवाजा

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवले जाणार आहेत. यांपैकी ४२ दरवाजांना १०० किलो सोन्याने लेपन केले जाणार आहे. यांतील पहिल्या सुवर्ण दरवाजाचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे. हा दरवाजा अनुमाने ८ फूट उंच आणि १२ फूट रुंद आहे. येत्या ३ दिवसांत आणखी १३ दरवाजे बसवण्यात येणार आहेत. हे दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून बनवले आहेत. हैदराबादच्या कारागिरांनी यावर कोरीव काम केले आहे. यानंतर त्यांच्यावर तांब्याचा थर लावून त्यावर सोन्याचा थर लावला आहे.

श्री रामललाचे सिंहासनही सोन्याचे !

श्री रामलल्लाचे सिंहासनही सोन्याचे बनवले जाणार आहे. हे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराचा शिखरही सोन्याचा असेल; मात्र हे काम शिखर पूर्ण झाल्यानंतर केले जाणार आहे.

सोने आणि चांदी यांपासून बनवल्या आहेत चरण पादुका !

भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या चरण पादुकाही मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. या चरण पादुका १ किलो सोने आणि ७ किलो चांदी यांपासून बनवलेल्या आहेत. भाग्यनगरचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत.