वनस्पती हे अन्न असणार्‍यांना ‘शाकाहारी’ म्हणतात, मांसाहारी नव्हे’ !

एका राजकारणी व्यक्तीने ५ दिवसांपूर्वी ‘राम मांसाहारीहोता’, असे (अकलेचे ?) तारे तोडले. त्यावर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे –

‘अरण्यकांड सर्ग १९ श्लोक १५’मध्ये शूर्पणखा राक्षसी तिचा भाऊ खर याला उद्देशून खालील श्लोक म्हणते –

फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।

– वाल्मीकि रामायण, काण्ड ३, सर्ग १९, श्लोक १५

अर्थ : फळ आणि मूळ हेच त्यांचे भोजन आहे. ते जितेंद्रिय, तपस्वी आणि ब्रह्मचारी आहेत. दोघेही राजा दशरथांचे पुत्र आणि परस्परांचे भाऊ आहेत. त्यांची नावे राम आणि लक्ष्मण आहेत.

मांसाहार करणारी एक राक्षसी सांगते आहे की, राम आणि लक्ष्मण हे शाकाहारी आहेत.

‘अयोध्याकांड, सर्ग ५२, श्लोक १०२’ याचा पुरावा या राजकारणी नेत्याने दिला आहे. यात ‘राम मांसाहारी होता’ असे म्हटले आहे’, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. तो खालीलप्रमाणे –

तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान् वराहमृश्यं पृषतं महारुरुम् ।
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासाय काले ययतुः वनस्पतिम् ।।

– वाल्मीकि रामायण, काण्ड २, सर्ग ५२, श्लोक १०२

अर्थ : ‘तेथे दोन्ही भावांनी मृगया – विनोदासाठी वराह, ऋष्य, पृषत आणि महारूरू या चार महामृगांवर बाणांनी प्रहार केले. तत्पश्चात जेव्हा त्यांना भूक लागली, तेव्हा पवित्र कंद-मूळ आदी घेऊन सायंकाळच्या वेळी रहाण्यासाठी (ते सीतेसह) एक वृक्षाच्या खाली गेले.’

इथे ‘वनस्पतिम्’ असा शब्दप्रयोग केला आहे. ‘वनस्पती हे अन्न असणार्‍यांना ‘शाकाहारी’ म्हणतात, मांसाहारी नव्हे’, याचा राजकीय नेत्यांना विसर पडला असावा, असे वाटते.

– श्री. वैभव दातार, प्राच्यविद्या अभ्यासक, संतचरित्र लेखक, कल्याण. (५.१.२०२४)