कोल्हापूर – लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी, उर्वरित अवैध बांधकामे १ जानेवारीपर्यंत हटवण्यात यावीत.
१ जानेवारीपर्यंत अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्यास विश्व हिंदु परिषद महापालिकेला घेराव घालेल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महापालिकेला निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक)
महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण हटवण्यासाठी १२ ऑक्टोबरला पंचनामा करण्यात आला होता. त्यानुसार ३० नोव्हेंबरला नोटीस बजावण्यात आली. यानंतर २४ घंट्यांचा कालावधी उलटल्यानंतरही कारवाई न झाल्याने २७ डिसेंबरला महापालिका प्रशासन कारवाईसाठी गेले होते. या प्रसंगी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. इतके सगळे होऊनही महापालिकेने अवैध बांधकाम न पाडता केवळ अनधिकृत बांधकाम ‘सील’ केले आणि कारवाई स्थगित केली. तरी ही कारवाई कोणत्या आधारावर स्थगित केली आणि त्या वेळी कारवाई पूर्ण न करण्याचे कारण महापालिकेने स्पष्ट करणे आवश्यक आहे. ‘महापालिकेने यापुढील काळात ही कारवाई वेळेत पूर्ण न केल्यास विश्व हिंदु परिषद प्रसंगी कोल्हापूर बंद आंदोलन करील’, अशीही चेतावणी त्यात देण्यात आली आहे.