अहिल्यानगर येथील ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि आघात’ या विषयावर व्याख्यान !
नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – प्राचीन भारतात ऋषिमुनींनी लावलेला शोध हा विदेशांनी आपापल्या नावे करून ‘स्वतःच शोध लावला’, असा गाजावाजा करून खोटे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या देशात आर्य बाहेरून आले नाही, तर आपल्याकडे श्रेष्ठ व्यक्तीला, चारित्र्यवान व्यक्तीला, धर्मधारण करणार्याला, सर्व समूहांमध्ये श्रेष्ठ असणार्याला आर्य म्हटले जात असे. विदेशी लोकांनी आपल्या इतिहासात पुष्कळ विकृती केली. शालेय पाठ्यपुस्तकात भारताचा खरा इतिहास शिकवणे आवश्यक आहे, त्यामुळे येणार्या पिढीला महान असे ऋषिमुनी आणि पराक्रमी राजांचा इतिहास माहिती होईल. यासाठी केंद्रशिक्षण मंत्रालय आणि राज्य शिक्षण मंत्रालय यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूर्वा वाकचौरे यांनी केले. त्या ह.भ.प. सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २३ डिसेंबर या दिवशी श्रीराम साधना आश्रम, मुकिंदपूर येथे ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी प्रकाश गिरीजी महाराज यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त, तसेच गीता जयंतीनिमित्त ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि आघात’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात बोलत होत्या.
समवेत आर्य द्रविडवाद, भाषावाद, उच्चनीचवाद, वर्णव्यवस्था या सर्व सूत्रांवर त्यांनी जागृती केली. या कार्यक्रमाच्या वेळी महंत ओंकार गिरीजी महाराज (पंचायती निरंजनी आखाडा हरिद्वार) आणि महंत काशी गिरीजी महाराज (पंचायती निरंजनी आखाडा, वसई) नेवासा येथील त्रिमूर्ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष हरिभाऊ धाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील ३७५ हून अधिक धर्मप्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.