आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन जत्रेचा दिवस ठरवण्यात येतो. त्यानुसार २६ डिसेंबर या दिवशी सकाळी देवीने दिलेल्या कौलानुसार २ मार्च २०२४ हा दिवस जत्रोत्सवासाठी ठरवण्यात आला आहे. आंगणेवाडी जत्रेचा दिनांक निश्चित झाल्यानंतर रेल्वे, तसेच खासगी बसगाड्या आणि अन्य वाहने यांच्या आरक्षणासाठी भक्तांची लगबग चालू होते. जत्रेचा दिनांक घोषित झाल्याने आता पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून ‘जत्रोत्सव सुरळीत व्हावा’, यासाठी नियोजन करण्यास प्रारंभ केला जातो. जत्रोत्सवाचा दिनांक ठरल्यामुळे आता २६ ते २८ डिसेंबर २०२३ हे ३ दिवस धार्मिक विधींसाठी श्री भराडीदेवीचे मंदिर बंद रहाणार आहे. त्यामुळे मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.