पुणे येथील ६०० चिमुकल्यांनी नृत्य आणि नाट्य यांतून उलगडले ‘गीतरामायण’ !
पुणे – ‘डी.ई.एस्. पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळे’च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गीतरामायणातील ३० प्रसंग नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या माध्यमातून अवघ्या ३ घंट्यांत उलगडले ! श्रीरामजन्माचा आनंदोत्कट क्षण, राम, सीता, लक्ष्मण वनवासाला निघाल्यानंतर अयोध्यावासियांच्या भावनांचा उठलेला कल्लोळ आणि हनुमानाच्या भेटीपासून ते सीतेची लंकेतून सुटका करत रावणाच्या वधापर्यंत अशा विविध प्रसंगांचा यात समावेश आहे. या कलाविष्काराने पालक, ज्येष्ठ नागरिक तर भारावलेच, तसेच या शाळेकडून ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’, असे २ विक्रम करण्यात आले.
अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर लोहिया मातृमंदिर शाळेच्या वतीने ‘गीतरामायण’ कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी गदिमांचे पुत्र आणि गायक आनंद माडगूळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते. बर्वे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात शाळेतील अडीच ते साडेपाच वर्षे या वयोगटातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रामायणातील विविध घटना प्रसंग उलगडले. या वेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारीत झाले.