पुणे – पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाहीत. त्यामुळे मोहीम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ’ यांच्या वतीने साकारण्यात येणार्या ‘मिडिया टॉवर’ या खासगी तत्त्वावरील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत, यासाठी गृहकर्जावरील व्याजावर (शुल्क) सवलत देण्याची योजना आणण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी या वेळी केले. त्यांच्या हस्ते २६ डिसेंबर या दिवशी भूमीपूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘हा नवी दिशा देणारा प्रकल्प पुणे येथे उभारला जात असून महाराष्ट्रातील इतर शहरांत असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष रहाण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल.’’