जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य वाहन फेरी !
जळगाव, २३ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु समाज राममंदिरासाठी संघटित झाला होता आणि लवकरच ते साकार होत आहे. आता हिंदु समाजाने रामराज्य साकार करण्यासाठी संघटित व्हायला हवे. यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी अधिकाधिक संख्येने सभेला यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या अहिल्यानगर येथील समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. येथे २४ डिसेंबर या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने वाहन फेरी काढण्यात आली. वाहन फेरीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. वासुदेव बेहडे यांच्या हस्ते नारळ वाढवून नेहरू चौकापासून फेरीला प्रारंभ झाला. शिवतीर्थ मैदानात फेरीची सांगता करण्यात आली. फेरीत शेकडोच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन, तर श्री. वासुदेव बेहडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. फेरीच्या मार्गाने दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त मंडळ, श्री रामदासस्वामी मंदिराचे विश्वस्त मंडळ, जळगावचे आमदार सुरेश भोळे, व्यावसायिक सोनी यांचे कुटुंब, ‘अमर टी’ स्टॉलचे मालक आदींनी विविध ठिकाणी धर्मध्वज पूजन केले. कोर्ट चौक, काव्य रत्नवली चौक येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कु. सायली पाटील यांनी केले. जळगावला लागूनच असलेल्या खेडेगावांतून तरुण मोठ्या संख्येने फेरीसाठी आले होते आणि सभा यशस्वी करण्याचा सर्वांनी निर्धार केला.
आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !स्थळ : शिवतीर्थ मैदान, जळगाव वक्ते : चाणक्य मंडलचे श्री. अविनाश धर्माधिकारी, सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छतीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर वेळ : सायंकाळी ५.३० वाजता |