मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने दोन दिवसांत घोषित करावा ! – मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे-पाटील

परभणी – यापूर्वी सरकारला ३ मास वेळ दिला. समिती गठीत झाली, तेव्हा काम झाले नाही. पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ आले. ३० दिवसांचा वेळ मागितला. पुन्हा समिती नेमली. त्यामुळे आता सरकारला कायदा संमत करण्यास अडचण काय आहे ? काही झाले, तरी मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने दोन दिवसांत घोषित करावा, अशी चेतावणी मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. ते सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.

मनोज जरांगे-पाटील पुढे म्हणाले, ‘‘सरकारने आता भानावर यावे. तडजोडीसाठी हालचाल करावी. आता आम्हाला नोटिसा द्याल, तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल. आता मराठ्यांनी सावध रहाण्याची आवश्यकता आहे. सरकारने जर एकाला अटक केली, तर सर्वांनी कारागृहात जायचे. आता आम्ही आमचे आरक्षण घेतल्याविना गप्प बसणार नाही.’’