पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महापालिकेत निवेदन

पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोर्कापण झाल्याचे प्रकरण !

पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक

कोल्हापूर – पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते. त्यामुळे अपूर्ण कामाचे उद्घाटन करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार, माजी नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे कोल्हापूर महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. हे निवेदन उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी स्वीकारले.

या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक श्री. अजित ठाणेकर, श्री. महेश उरसाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. हिंदूराव शेळके, पंडित पोवार उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून हिंदु समाज आणि संघटना या स्मारकासाठी काम करत आहेत. त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. असे असतांना राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांनी त्याचे उद्घाटन केले. त्यातून हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. याचे दायित्व महापालिकेचे असतांना राजकीय नेत्यांनी कसे काय उद्घाटन केले ? त्यांच्यावर महापालिकेने गुन्हे का नोंद केले नाहीत ? वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पुलाचे उद्घाटन केल्याने ज्याप्रकारे गुन्हा नोंद झाला, त्याप्रमाणे येथेही करण्यात यावा. येणार्‍या ८ दिवसांत गुन्हे नोंद न केल्यास शहर आणि कागल येथील अन्य कामांचे उद्घाटन सकल हिंदू समाज करेल.