स्मारकाविषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देहली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याविषयी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २२ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेणे आवश्यक आहे, तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी देहली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. या वेळी ‘स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी आहे. स्मारकाविषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करील’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारका’विषयी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहली येथील कार्यालयात भेट घेतली.

या वेळी खासदार भोसले म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तूशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संशोधक आणि अभ्यासक यांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल. शिवरायांच्या इतिहासात सुसूत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून शिवरायांची अप्रकाशित कागदपत्रे, चित्रे, शस्त्रास्त्रे, तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन अन् संपादन करणे आवश्यक आहे.’’

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक, ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची आवश्यकता आहे.’’