रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री. अतुल बधाले आणि सौ. आनंदी बधाले यांच्या विवाह सोहळ्याच्या वेळी आलेल्या नातेवाइकांनी अनुभवलेला आनंद अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

‘२८.११.२०२२ या दिवशी श्री गुरूंच्या कृपेने सौ. आनंदी बधाले (पूर्वाश्रमीच्या कु. पूजा नलावडे) आणि श्री. अतुल बधाले यांचा शुभविवाह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात उत्साहात, आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी दिलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. अतुल बधाले

१. सौ. सविता डुंबरे (सौ. आनंदी यांची मावशी)

‘आमची गाडी मडगावला पोचल्यावर श्रीकृष्णाचा नामजप आपोआप चालू झाला. मला आश्रम पहातांना पुष्कळ आनंद जाणवला.’

२. सौ. मीलन भोर (सौ. आनंदी यांची मावशी)  

अ. ‘मी ३ घंटे प्रवास केला, तरी माझे पाय सुजतात; पण इकडे येतांना जवळ जवळ १० – १२ घंटे प्रवास करूनही पाय अजिबात सुजले नाहीत. मला प्रवासात काही त्रास झाला नाही.

आ. मला आश्रमातील स्वच्छता आणि शिस्त पाहून पुष्कळ आनंद झाला. मला विवाहातील धार्मिक विधी आवडले.’

सौ. आनंदी बधाले

३. प्रमिला आरोटे (सौ. आनंदी यांची मावशी)

अ. ‘मडगाव रेल्वेस्थानकावर आम्हाला घेऊन जाण्यासाठी साधक आले होते. त्या वेळी त्या साधकांच्या कपाळावरील लाल कुंकवाचा टिळा पाहून माझा भाव जागृत झाला.

आ. आमची विवाहाच्या आदल्या दिवशी ठाणे येथून रात्री १.१० वाजताची गाडी होती. ती गाडी ५ ते ६ घंटे उशिराने आल्यामुळे आम्हाला ठाणे रेल्वेस्थानकावर रात्रभर रहावे लागले. आम्हाला आश्रमात जाण्याची ओढ लागल्यामुळे कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवला नाही आणि आमची कुणाचीही चिडचिड झाली नाही, याचे आम्हालाही आश्‍चर्य वाटले. तेव्हा ‘आम्हाला देव शक्ती देत होता’, असे वाटत होते.

इ. आश्रमात आल्यावर आम्हाला चांगले वाटले. आश्रमातील साधकांचा सेवाभाव आणि प्रेमभाव पाहून आमचा उत्साह वाढला.

ई. विवाहसोहळ्यातील शिस्त आणि शांतता पाहून मन भरून आले.’

४. सौ. विद्या नलावडे

सौ. विद्या नलावडे

४ अ. ‘लग्नाला आलेल्या नातेवाइकांना सेवा आणि साधना करून आनंदी रहावे’, असे वाटणे : ‘पूजाच्या लग्नाला आलेल्या सर्व नातेवाइकांमध्ये फार उत्साह जाणवत होता. सर्व जण आनंदी होते. पूर्वी नातेवाइकांचा साधनेला आणि आम्ही रामनाथी आश्रमात साधनेला आलो, त्यासाठी विरोध होता. आश्रमात येऊन गेल्यावर ‘आम्ही जे केले आहे, ते चांगले केले आहे’, असे त्यांना मनापासून वाटायला लागले. आता ‘आपणही सेवा आणि साधना करावी अन् आनंदी रहावे’, असे त्यांना वाटत आहे.

४ आ. वडिलांना ‘आश्रमातच रहावे’, असे वाटणे : माझे बाबा म्हणाले, ‘‘एकदा आश्रमात प्रवेश केला की, सर्व मायेचा विसर पडतो आणि पुष्कळ चांगले वाटून आनंद मिळतो. मला ‘येथेच रहावे’, असे वाटत आहे.’’

 ४ इ. नातेवाइकांनी साधना आणि धर्मकार्य करण्यास आरंभ करणे : रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून परत गेल्यानंतर एका बहिणीने हळदी-कुंकवात वाण द्यायला सनातनची सात्त्विक उत्पादने घेतली. माझ्या मोठ्या दिराच्या मुलीने श्रीकृष्ण-अर्जुन रथाची फ्रेम, श्रीकृष्णाचे मोठे चित्र घरात लावायला घेतले. ती पुण्याला ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे, त्या शाळेमधील मुलांना बालसंस्कारवर्ग, शिक्षकांसाठी प्रवचन घेण्यासाठी विचारणा केली. तिने शाळेतील मुलांकडून नामजप करून घेण्यास आरंभ केला. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाविषयी शाळेतील मुलांना जागृत केले अन् स्वतःच्या मुलांना तिच्याकडून होणार्‍या चुका सांगण्यास सांगितले.’

गुरुदेवांनीच वरील सूत्रे मला लक्षात आणून दिली आणि माझ्याकडून लिहून घेतली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. विद्या नलावडे (सौ. आनंदी बधाले यांची आई), फोंडा, गोवा.  (२०.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक